स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस इंदापुरात मशाल रॅली
इंदापूर – राज्यातील तरुण पिढीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना दृढ करण्यासाठी व प्रत्येकाच्या नसानसात देश भावना, राष्ट्रीयत्व अधिक प्रभावी रुजले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस मशाल रॅलीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करते आहे. यामध्ये सर्व युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुका कार्यकारिणी बैठक गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे पार पडली. यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन ते करत होते. तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम पाटील, तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, कार्याध्यक्ष सचिन खामगाळ, विध्यार्थी अध्यक्ष सागर व्यवहारे, शहर युवकध्यक्ष इम्रान शेख, विध्यार्थी शहर अध्यक्ष रविराज साळुंखे यांच्यासह युवक व विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुण पिढी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. या तरुणांच्या माध्यमातूनच नवा आदर्श राज्य पुढे निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असल्याने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षअध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, यांच्या विचारधारेतून पक्षाची व पक्षाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व कमिट्यांची कामकाज सुरू आहे.
देशात अराजकता पसरली असून, सत्ताधाऱ्यांकडून रोज लोकशाहीवर हल्ला केला जातोय. देशातील सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करतेय. यामुळे देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. हे आता तरुणांनी लक्षात घेऊन नव्या क्रांतीची मशाल हाती घेतली पाहिजे. 14 ऑगस्ट रोजी रात्री राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने इंदापूर शहरात मशाल रॅलीचे आयोजन केले आहे. अशी माहिती युवक अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर यांनी दिली.
राज्यपालांना पदावरून हटवणे गरजेचे
राज्यपाल सातत्याने महाराष्ट्र व राज्यातील महापुरुषांचा अवमान करीत आहेत. राज्याचा द्वेष करतायत. राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेऊन त्याचे पालन ते करत नाही. म्हणून त्यांना त्या पदावरुन हटवावे, अशी मागणी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम पाटील यांनी केली.