पिंपरी – शाळेचे बूट न घातल्याने शाळेतून 25 विद्यार्थ्यांना हाकलून दिले. त्यापैकी एक विद्यार्थी घाबरुन घरीच न गेल्याने त्याच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा मुलगा सापडला. ही घटना शनिवारी (दि. 6) तापकीर नगर मधील बेबीज इंग्लिश स्कूल आणि काळेवाडी परिसरात घडली.
याप्रकरणी बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी रविवारी (दि. 7) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा 15 वर्षीय मुलगा तापकीर नगर मधील बेबीज इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. शनिवारी सकाळी सात वाजता तो शाळेत गेला. शाळेत पीटीच्या तासाला त्याच्याकडे शूज नसल्याने त्याला शाळेतून बाहेर काढले. त्याच वेळी एकूण 25 विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले होते.
इतर सर्व विद्यार्थी आपापल्या घरी गेले. मात्र फिर्यादी यांचा मुलगा घाबरून त्याच्या मित्राच्या घरी गेला. शाळेची वेळ होऊन गेली तरी तो घरी आला नसल्याने घरच्यांची चिंता वाढली. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने पालकांनी शाळेत, घराच्या परिसरात, नातेवाइकांकडे शोधाशोध सुरू केली. मात्र तो सापडला नाही. रविवारी सकाळी तो डांगे चौकात सापडला. त्याच्याकडे पालकांनी चौकशी केली असता शाळेतून काढले म्हणून भीतीपोटी तो आपल्या घरी न येता मित्राच्या घरी गेला असल्याचे त्याने सांगितले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.