शरद पवारांवरच राष्ट्रवादीच्या प्रचाराची भिस्त

मुंबई: भाजपाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच पक्षातील ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार पक्ष सोडून जात असल्याने निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराची भिस्त पुन्हा एकदा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरच असणार आहे. पक्षात राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एकटे पवारच गावोगावी, जिल्ह्याजिल्ह्यांत फिरून स्थानिक नेत्यांना विश्वास देण्याचे आणि कार्यकर्त्याचे मनोबल उंचावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपाला जवळपास अंतिम स्वरूप देऊन पवारांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर पक्ष पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. प्रत्येक निवडणुकीत पवारांनीच पक्षाच्या प्रचाराची धुरा वाहिली. त्यावेळी छगन भुजबळ, दिवंगत आर. आर. पाटील यांनी त्यांना साथ दिली. 2014 पासून सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव होऊन पवारांचा उत्साह अजिबात कमी झालेली नाही. आजही वयाच्या 79 वर्षी पवार पक्षाच्या उमेदवारांचा झंझावाती प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या महिन्यात शिवस्वराज्य यात्रेत अग्रभागी राहिलेले राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते गेल्या 15 दिवसांपासून पक्षाच्या प्रचारापासून बाजूला झाले असले तरी ते कॉंग्रेस तसेच छोट्या पक्षांसोबतचे जागावाटप, उमेदवार निश्‍चिती, अन्य पक्षातील वजनदार नेत्यांना पक्षात प्रवेश देणे तसेच निवडणूक व्यवस्थापन आदी कामात व्यस्त असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजित पवार ठिकठिकाणी प्रचारसभा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)