दुर्गमभागात ‘ड्रोन’ करणार औषध पुरवठा

पुणे, नंदुरबारमध्ये राबवणार पहिला प्रयोग: खासगी कंपनीशी केला करार

मुंबई: राज्यातील दुर्गम भागातील नागरीकांना तातडीने औषधोपचार मिळावे यासाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी खास ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. सध्या नंदुरबार व पुणे जिल्ह्यात दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येणार असून ही योजना यशस्वी झाल्यास राज्याच्या इतर भागात ड्रोनचा वापर करण्यात येईल. वैद्यकिय क्षेत्रात असा प्रयोग करणारा महाराष्ट्र हा देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात रक्ताचा पुरवठा व लसींचा वेळेवर पुरवठा होत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. खास करून सर्पदंशावरील लसी वेळेवर उपलब्ध न झाल्यास अनेकजण मृत्युमुखी पडतात. इतर जीवनावश्‍यक लसीही वेळेवर रुग्णांना उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पालघर, नंदुरबार, गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात काही वॉंटर अँब्युलन्सचा प्रयोग राबवण्यात आला आहे. पण आता नंदुरबार व पुणे जिल्ह्यात रक्त, लस व औषधांचा तातडीने पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची योजना राज्याच्या आरोग्य विभागाने आखली आहे.

या योजनेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने झिपलाईन इंटरनॅंशनल इन्कॉंर्पोरेशन या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. ही योजना दोन वर्षासाठी प्रायोगिक तत्वार राबवण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या योजनेसाठी राज्य सरकार झिपलाईन कंपनीला कोणताही निधी देणार नाही. ही योजना प्रायोगिक तत्वार आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्य सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्यास राज्य सरकारवर कोणतीही जबाबदारी राहणार नाही असे करारात नमूद केले आहे. मात्र दोन वर्षानंतर ही योजना सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्यास दोन वर्षानंतरच्या प्रचलित धोरणानुसार सरकारकडून कार्यवाही करण्यात येईल. या ड्रोन भरारीच्या योजनेमुळे मात्र वैद्यकीय सेवेत मोठा बदल होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)