पुणे (मारुती जैनक) -चार्ल्स शोभराज.. याची गुन्हेगारी केवळ चार वर्षांची. मात्र, यात त्याने क्रौर्याची परिसीमा गाठली. तब्बल 42 जणींचं आयुष्य संपवलं. ना गॅंग.., ना साथीदार, अकेला ही काफी… गुन्ह्याची ही पद्धत वापरत त्याने घडविलेल्या नरसंहाराने कित्येक देशांना हादरवून सोडले होते, अशावेळी एक मराठमोळा पोलीस अधिकारी समोर आला, त्यांचे नाव मधुकर झेंडे. पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी हे या अधिकाऱ्याचे गाव. अमेरिका, फ्रान्स, नेपाळ आणि भारत या देशांत “मोस्ट वॉन्टेड’ असलेल्या या चार्ल्सच्या मुसक्या आवळत झेंडे यांनी त्याला गजाआड केले. तेही एकदा नव्हे, दोनदा..! जन्मठेपेची शिक्षा भोगलेला चार्ल्स आता वार्धक्याच्या सुरकुत्या घेऊन नेपाळच्या तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर आजही भीती दिसते ती मधुकर झेंडे या नावाची.
महाराष्ट्र पोलीस खात्यातून सहाय्यक आयुक्त पदावरून मधुकर झेंडे हे निवृत्त झाले असले, तरी राज्यातूनच नव्हे; तर अवघ्या देशासह अन्य देशांतही मधुकर झेंडे यांचे नाव आजही तेवढ्याच आदबिने घेतले जाते. 1970 च्या दशकातील शोभराज नामक “डॉन’ दोन दिवसांपूर्वी नेपाळच्या तुरुंगातून बाहेर आला, तो त्याची जन्मभूमी असलेल्या पॅरिस देशात गेला. तरी त्याच्यावर गुन्हेगारीचे ओझे कायम आहे, त्यातही जगाला हादरवून सोडणाऱ्या त्याच्या या भयान डॉनगिरीचा खात्मा करणारे या कथानकाचे नायक ठरलेले मराठमोळे अधिकारी मधुकर झेंडे यांचीच कामगिरी आजही सातासमुद्रापार चार्ल्सच्या गुन्हेगारीच्या बळी ठरलेल्या त्या लेकी-सुनांच्या आई-वडिल्यांच्या, नातलगांच्या लक्षात राहिली आहे. याच कारणातून पोलीस खात्यातून निवृत्तीनंतर प्रामाणिकपणाचे मेडल मिरवत सुखी आयुष्य जगणाऱ्या या कथानकातील नायकाचे अर्थातच मधुकर झेंडे यांची आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न ‘प्रभात’ने केला.
या कथेचा गाभा आजही त्यांच्या चांगला लक्षात राहिला आहे, ते म्हणाले, “1971 मध्ये एका बॅंकेवरील दरोड्याच्या गुन्ह्यात शोभराजला पहिल्यांदा अटक केली. शोभराज पुन्हा एकदा 1976 मध्ये भारतात आला. त्यावेळीही त्याला जेरबंद केले.
त्याची रवानगी तिहार जेलमध्ये केली. 10 वर्षे तो तेथे होता. तेथूनही तो पळाला. तो गोव्यात आल्याची टीप मिळाली त्यावेळी मी पथकासह गेलो आणि तेथून त्याला मुंबईत आणले. तो आज बाहेर आला. त्याच्यासारख्या गुन्हेगाराला पकडले याचे समाधान आजही आहे,’ असे झेंडे यांनी सांगितले.
पणजीच्या बारमध्ये ‘झेंडे प्लॅटर’ नावाची डिश…
गोव्यातील पणजी पुलाजवळच असलेल्या “क्यू ऐकेरो बार’मध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध अधिकारी मधुकर झेंडे यांच्या नावावरून “झेंडे प्लॅटर’ नावाची डिश आजही प्रसिद्ध आहे. याच बारमध्ये झेंडे यांनी सापळा रचून अत्यंत नियोजनबद्धरित्या चार्ल्स शोभराज याच्या मुसक्या आवळल्या होत्या. झेंडे याच्या याच कामगीरीवर खूश होऊन बारच्या मालकांनी एका डिशला त्यांचे नाव दिले आहे. आजही या बारमध्ये ही डिश उपलब्ध आहे.