सातारा – शहरातील बुधवार नाका परिसरातील जयेश एंटरप्राइजेस या फर्निचरच्या गोडाऊनला शनिवारी वीजपुरवठा करणाऱ्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, इलक्ट्रिक मशीन आणि इतर फर्निचर जळून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन अवघ्या पाऊण तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. गोडाऊनमधून आगीचे मोठे लोळ बाहेर पडू लागल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवार नाका परिसरात राजेंद्र धर्मेंद्र शर्मा (वय 29, रा. मोळाचा ओढा, सातारा) यांनी हे गोडाऊन भाड्याने घेतले आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे फर्निचरच्या गोडाऊनमध्ये काम सुरू होते. गोडाऊनमध्ये चार ते पाच कर्मचारी कामावर होते. गोडाऊनला वीजपुरवठा करणाऱ्या मीटरमधून अचानक मोठा जाळ होऊन एकदम आगीचा भडका उडाला. सर्व कामगार तात्काळ गोडाऊनच्या बाहेर पडले. मात्र, आतील इलक्ट्रिक मशीन आणि फर्निचरचे इतर साहित्याने तातडीने पेट घेतला. आणि आग संपूर्ण गोडाऊनमध्ये पसरत गेली. त्यामुळे संपूर्ण गोडाऊनमध्ये आगीच्या ज्वाला दिसू लागल्या.
आग भडकल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीचे वृत्त कळताच शाहूपुरी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचा मारा सुरू करून आग आटोक्यात आणली. मात्र, तत्पूर्वी गोडाऊनमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची दाहकता इतकी होती की लगतच्या सिमेंटच्या गोडाऊनला सुद्धा आगीची झळ बसली. हे गोडाऊन सरकारी वकील महेश कुलकर्णी यांच्या मालकीचे आहे त्याचेही या आगीमध्ये थोडेफार नुकसान झाले. आगीच्या धगीमुळे छप्पराच्या पत्र्याला सुद्धा भगदाड पडले.
हे गोडाऊन रहिवासी क्षेत्रामध्येच होते. आजूबाजूला दाट लोकवस्ती होती. मात्र, अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणल्याने मोठी वित्तहानी झाली नाही. शाहूपुरी पोलिसांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवली होती. राजेंद्र शर्मा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. हवालदार एस. एस. भिंगारदिवे तपास करत आहेत.