नांदेड – कोरोनाकाळात प्रत्येक डॉक्टर हा देवासमान होता. अचानक सुरु झालेल्या या महामारीमध्ये उद्योग व्यवसाय असं सर्वकाही थांबलं होत. अगदी शाळा कॉलेजेस देखील बंद होते. असं असूनही हा कोरोनाकाळ सर्वसामान्यांना खूप काही शिकवून गेला.कोरोनाकाळात देवदूतासमान वाटणाऱ्या डॉक्टरांना पाहून नांदेडच्या एका कन्येने देखील डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले.
कोरोनाकाळात ज्योती कंधारे ही दहावीला होती. कोरोनाकाळात डॉक्टरांना पाहून तिने देखील उराशी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. अन् सुरु झाला अडचणींचा प्रवास. परिस्थिती हालाकीची कुटूंबियांना उदरनिर्वाहासाठी केवळ शेतीचा आसरा. अशात समोर डॉक्टर होण्याचं स्वप्न. ज्योतीला घरच्यांकडून केवळ प्रोत्साहन एवढीच शिदोरी मिळणार असल्याची कल्पना होती तरीही तिने हे धाडस केलं.
नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथे राहणाऱ्या ज्योतीने बारावी पास होताच पहिल्याच प्रयत्नात नीटची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवल.विशेष म्हणजे यासाठी ज्योतीनं कोणताही क्लास लावला नव्हता. मात्र तिचा नीटची परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.
गावातच प्राथमिक आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या ज्योतीने गावातीलच काही व्यक्तींचे मार्गदर्शन घेत नीटची तयारी सुरु केली. शेतात रोज पाच सहा तास काम करून यू ट्यूब सारख्या माध्यमाचा अभ्यासासाठी वापर करत ज्योतीने निटसाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली. 720 पैकी 563 गुण मिळवत ज्योतीने नीटच्या परीक्षेत चांगले यश मिळवले.
कंधारे यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे.अंकुश कंधारे यांची अडीच एकर जमीन असून त्यावरच संपूर्ण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.यामुळे ज्योतीचा यापुढील प्रवास आणखी कठीण आहे. कारण आता डॉक्टरकीसाठी सरकारी कोट्यातून नंबर लागला तरच ती डॉक्टर होऊ शकते कारण खासगी कॉलेजमध्ये शिकण्यासाठी ज्योतीची आर्थिक परिस्थिती तितकीशी सक्षम नाही.