मुंबई – ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. ठाणे-कळवा मनिषा नगर भागात ही घटना घडली आहे. अयोध्या पोळ यांना 16 जूनला संध्याकाळी 5 वाजता कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भीम नगर या ठिकाणी एका कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.
अयोध्या पोळ या सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू मांडत असतात. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अयोध्या पोळ ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यात आघाडीवर होत्या. दरम्यान, आता शाईफेक आणि मारहाण प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
मुंबईतील कळवा पोलीस ठाण्यातच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेहऱ्याला शाही लावणाऱ्या महिला, तसेच त्यांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 300/2023 भादवि कलम 143, 145, 147, 149, 341, 323, 324, 120 ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच, आता कळवा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.