जामखेड (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून वीज पुरवठा करत असलेले महावितरण आता स्मार्ट झालंय. म्हणजेच ऑनलाईन बिल भरणे, ऑनलाईन रिडींग करणे त्याचबरोबर काही तक्रार असल्यास ती देखील ऑनलाईन करण्याची सेवा महावितरणने केली आहे. मात्र अशातच इस्त्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाला जामखेड महावितरणाकडून चक्क एका महिन्याचे चाळीस हजाराचे बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून या व्यवसायिकाला दरदरून घाम फुटला. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महावितरण आपल्या सेवेबाबत अनेक दावे करत असते मात्र अनेकदा चुकीचं बिल रिडींग व अव्वाच्या सव्वा वीज बिले आल्याची उदाहरणे अनेक आहेत. जामखेड महावितरणच्या या मनमानी कारभाराचा अनेकांना फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. आता असाच प्रकार जामखेडमध्ये समोर आला आहे. कोर्ट रोड वरील परीट गल्ली येथे इस्त्री करून उदरनिर्वाह करणारे दत्तू भगवान काटकर या छोट्या व्यवसायिकाला महावितरणाकडून चक्क चाळीस हजारांचं बिल पाठवण्यात आलं आहे. हे बिल पाहून या व्यवसायिकाला दरदरून घाम फुटला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील परीट गल्ली येथे राहणारे दत्तू काटकर यांचं इस्त्रीचं छोटासा दुकान आहे. कपड्याना इस्त्री करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या छोट्याशा घरात केवळ तीन बल्ब आणि एक पंखा, एक इस्त्री एवढीच इलेक्ट्रिकची उपकरणं आहेत. त्यातही इस्त्री सकाळी एक तास व रात्री एक तास चालते मात्र त्यांना महावितरणकडून तब्बल 40० हजार 490 रुपयांचं इतके बिल आल्याने तालुक्यातील सर्वंच ग्राहकांच्या भुवया उंचावल्या असून,
महावितरण विभागाच्या गलथान कारभाराविषयी रोष निर्माण होऊन नाराजी व्यक्त केली जात आहे. या बिलाबाबत काटकर यांनी महावितरण कार्यालयात तक्रार केली. मात्र या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही व त्यांना तातडीनं वीजबिलाचा भरणा करण्यास सांगितलं.
मात्र माझी थकबाकी नसताना मी एवढं बिल कसं भरू अशी विचारणा काटकर यांनी केली. मात्र त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही. या व्यावसायिकाचे म्हणणे आहे की, दर महिन्याला आपल्याला 500 ते 700 रुपयांपर्यंत वीजबिल येते त्या बिलाचा भरणाही वेळेवर करतो. तरीही एवढ्या मोठ्या रकमेचं बिल आलं आहे. याची तक्रार केल्यानंतरही कोणी दखल घेतली नाही.