परिवारालाही दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळावी – गांगुली

नवी दिल्ली -भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात परिवारालाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी भारतीय क्रिकेटपटूंनी बीसीसीआय व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे केली आहे. खेळाडूंच्या या मागणीला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
खरेतर प्रत्येक मालिकेच्या वेळी ज्या देशात स्पर्धा असते त्याच देशाचे क्रिकेट मंडळ परदेशी संघांच्या खेळाडूंच्या तसेच त्यांच्या परिवाराच्या निवासासाठी तसेच अन्य सर्व सुविधांची व्यवस्था तसेच त्यावरील खर्च करते.

यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ अमिरातीतूनच थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. त्यामुळे सलग काही महिने खेळाडू आपल्या परिवाराशिवाय कसे राहू शकतील, असेही गांगुली यांनी विचारणा केली आहे. खेळाडूंची मागणी रास्त आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळही या गोष्टींना परवानगी देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून भारतीय खेळाडू अमिरातीत आहेत. त्यांना करोनाचा धोका होऊ नये यासाठी खेळाडूंना त्यांच्या परिवारासह बायोबबल सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापासून रोखण्याचे एकही कारण नाही, असेही गांगुली म्हणाले.

अमिरातीत अनेक खेळाडू आपली पत्नी व मुलांसह दाखल झाले होते. तसेच काही खेळाडूंच्या मैत्रिणीही येथे उपस्थित आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरदेखील पत्नी आणि कुटुंबीयांना घेऊन जाऊ देण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे. या मागणीलाही गांगुली यांनी पाठिंबा दिला आहे.

बीसीसीआयची भूमिका महत्त्वाची
बीसीसीआयनेही पूर्वी अनेकदा खेळाडूंना परिवारासह दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, नंतर त्यावर बंदीही घातली होती. आता पुन्हा एकदा या मागणीने जोर धरला असल्याने त्यावर ऑस्ट्रेलिया मंडळ काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.