नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी रविवारी पंजाबचा दौरा करणार आहेत. त्या दिवशी ते पक्षाचा चेहरा ठरणाऱ्या नेत्याच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब दौऱ्यावर असणाऱ्या राहुल यांनी लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर कॉंग्रेसने पंजाबमधील नेते आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी याही पंजाबमधील नेत्यांशी चर्चा करत असल्याचे समजते. त्याशिवाय, पक्ष जनमतही जाणून घेत आहे. कॉंग्रेसचा चेहरा बनण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात चुरस आहे. आता कॉंग्रेस त्या दोघांपैकी एकाची निवड करणार की धक्कातंत्राचा अवलंब करून तिसरेच नाव पुढे करणार याविषयी कुतूहल आहे.