संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानची फजिती केल्याचे कारण देत केले पदावरून दूर
इस्लामाबाद : संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानची गोची करणाऱ्या पाकच्या राजदूत मलिहा लोधी यांची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हकालपट्टी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या जागी आता मुनीर अक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुनीर अक्रम यांनी यापूर्वी 2002 ते 2008 दरम्यान या पदावर आपली जबाबदारी पार पाडली आहे. न्यूयॉर्क येथील मुख्यालयात ते काम पाहणार असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नियुक्त्या केल्या आहेत. त्यात राजदूत मुनीर अक्रम यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. अक्रम यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अन्य नियुक्त्यांचीदेखील घोषणा केली. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे महासंचालक खलील अहमद हाशमी यांची संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधीच्या रूपात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीन नव्या राजदुतांचीही नियुक्ती केली आहे. मोहम्मद एजाझ यांना हंगेरीचे तर सय्यद सज्जाद हैदर यांना कुवैतचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.