पुणे – वाहतूक पोलिसांच्या “आभार’ योजनेमध्ये विविध दुकाने, “फूड डिलेव्हरी साईट’सह आता “पेटीएम’चा समावेश झाला आहे. पूर्वी कूपन देण्यात येत होते. मात्र, आता वाहनचालक स्वत:देखील “डिस्काऊंट कूपन’ प्राप्त करू शकणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवले आणि वाहनावर कोणताही थकीत दंड नसेल, नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकाला “आभार’ कूपन देण्यात येते. जूनपासून राबवण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत 30 हजारांपेक्षा अधिक वाहनचालकांना कूपन दिले आहे. मात्र, आता नव्याने झालेल्या समावेशानुसार वाहनचालक आपल्या वाहनावर खटला आहे की नाही हे “महाट्रॅफीकईचलन.जीओव्ही.इन/पेईचलन’ या संकेतस्थळावर पाहू शकतात. संबंधिताला त्याच्या नावे कोणताही थकीत दंड किंवा खटला नसल्याने सवलतीचे कूपन मिळवता येणार आहे.
कूपनद्वारे वाहनचालकाला मिळालेल्या क्रमांकानुसार वाहनचालकाला हॉटेल्ससह विविध दुकाने, “फूड डिलेव्हरी साईट’वर सवलत मिळते. यामध्ये आता “पेटीएम’ची भर पडली आहे. याद्वारे “आभार’ योजनेचे कूपन असल्यास नागरिकांना बस तिकिटाच्या आरक्षणावर 100 रुपयांपर्यंत, तर विमान तिकिटाच्या आरक्षणावर 1 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळणार आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.