ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून वेगळाच “फंडा’
कर्जत – कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे पालकमंत्री प्रा. राम शिंदे तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.
कर्जत- जामखेड मतदारसंघात पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी प्रश्न महत्वाचे असताना सत्ताधाऱ्यांकडून जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना देवदर्शनाचा लाभ दिला जात आहे. जनता हिच देव मानून त्यांना पाणी पाजले असते तर ऐन निवडणुकीच्या काळात देवदर्शन घडवण्याची नामुष्की ओढवली नसती अशी चर्चा रंगू लागली आहे. देवदर्शनाचा घाट घातला जात आहे.
जे गरजेचे आहे त्याकडे पाठ फिरवून ‘मनी नाही भाव अन् देवा मला पाव’ ही भावना मिरवण्यात सत्ताधारी धन्यता मानत आहेत. ऐन उन्हाळाभर व उन्हाळा उलटून गेला तरी कर्जत-जामखेड हे दोन्हीही तालुके पिण्याच्या पाण्यासाठी होरपळत होते. जनावरे जगवणे तर कठीण होऊन बसले होते. अशावेळी पाणी,चारा उपलब्ध करण्याची अत्यंत गरज असताना पालकमंत्री राम शिंदे यांनी दुर्लक्ष केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मात्र देवदर्शनाचा घाट घालून विकासाच्या मुद्द्याला बगल देण्यात येत आहे. दुसरीकडे सत्ता नसताना दोन्हीही तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर स्वखर्चाने पोहोच करून जनतेची तहान भागवण्याबरोबरच अनेक प्रश्न मार्गी लावणाऱ्याला जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहात नाही.