नसरापूर बैठकीत मा.तालुकाप्रमुख जगताप यांनी व्यक्त केला विश्वास
कापूरहोळ – भोर विधानसभा मतदार संघात 2014 मध्ये शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी अशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, त्यांना क्रमांक दोनची मते मिळाली. यावेळी शिवसेनेला चांगले वातावरण आहे. त्यामुळे कोंडे यांना पुन्हा संधी दिली गेली तर भोरचा विद्यमान आमदार नक्की बदलू शकतो, असा विश्वास माजी तालुकाप्रमुख पोपटकाका जगताप यांनी व्यक्त केला.
भोर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांची बैठक नसरापूर येथे अयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी बैठकीत भोर विधानसभेत गेली अनेक वर्ष हुलकावणी देणाऱ्या विजयासाठी दरवेळी उमेदवार न बदलता पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. भोर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या या बैठकीसाठी नसरापूरचे माजी सरपंच प्रकाश चाळेकर, माजी कामगार सेनाप्रमुख माधवराव शिंदे, महिला आघाडीच्या निशा सपकाळ, दिलीप डेरे, सदाशिव खोपडे, दिलीप अप्पा कोंडे, उत्तम निकम, सतीश शिळीमकर, नारायण कोंडे, राजेंद्र शिळीमकर, दिनकर चोरघे, विनायक खुटवड, विजय कव्हे, दत्तात्रय कानडे, दिपक भदे, सचिन राऊत, विरेश जंगम आदी जुने शिवसैनिक उपस्थित होते.
या बैठकीत जगताप यांनी सांगितले की, जुन्या शिवसैनिकांनी वयाचीसाठी पार केली आहे. गेली अनेक वर्ष शिवसेना या मतदार संघाच्या विजयासाठी लढा देत आहे अनेक उमेदवार निवडणुकी पुरते आले. पण, निवडणुकीनंतर पक्षा पासुन लांब गेले. मात्र, जुना शिवसैनिक सेनेत कायम राहीला आहे.
दिनकर चोरघे यांनी सांगितले की, पक्षाने आयात उमेदवाराला उमेदवारी देऊ नये त्यामुळे पक्षाचे दरवेळी नुकसान होते आहे. प्रकाश चाळेकर म्हणाले की, शिवसेनेने अद्याप एकदाही मागील निवडणुकीतील उमेदवार पुन्हा संधी दिलेली नाही मागील वेळी कोंडे यांनी चांगली लढत दिली होती. दिलीप डेरे यांनीही जनमानसात मिसळलेल्या निष्ठावानालाच उमेदवारी दिली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी निशा सपकाळ, माधवराव शिंदे, अंकुश ढेकाणे, विजय कव्हे आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या बैठकीतील निर्णयाची माहीती पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात येणार असुन जुन्या शिवसैनिकांच्या भावना विचारात घ्याव्यात असा अग्रह धरणार असल्याचे समन्वयक नारायण कोंडे यांनी सांगितले.
शिवसेनेने पुन्हा संधी द्यावी…
जुन्या शिवसैनिकांच्या बैठकीतील निर्णयाबाबत कुलदीप कोंडे यांना विचारले असता या जुन्या शिवसैनिकांचे माझ्यावर प्रेम आहे. परंतु, मी गेल्या कालावधीत त्यांना न्याय देऊ शकलो नाही. तरी देखील त्यांच्या मनात माझ्या बद्दल कोणतीही त्रासदायक भूमिका नसते. माझे बद्दलचे प्रेम व माझे काम करणेची पद्धत योग्य असेल म्हणून माझी भूमिका विचारात घेत आहेत. मी उमेदवारी मागीतली आहे. मला पुन्हा संधी दिली तर निष्ठेने प्रयत्न करून विजय खेचून आणू नाहीतर पक्षाचे वरिष्ठ जो उमेदवार देतील त्यास विरोध न करता त्या उमेदवाराच्या विजयासाठी मी प्रचार करणार आहे, मी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सोडणार नाही.