लंडन – जागतिक फुटबॉल क्षेत्रात करोनाचा धोका अद्याप कायम असला तरीही बुंदेसलीगा व ला लीगा स्पर्धेनंतर आता युरोपातील अत्यंत मानाची इंग्लिश प्रीमिअर लीग (इपीएल) 17 जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेशी संबंधित जवळपास डझनभर खेळाडू, सपोर्ट स्टाफ करोनाने ग्रस्त असूनही ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याने आयोजकांवर टीकेची झोड उठली आहे.
करोनाचा धोका सुरू झाल्यानंतर अनेक देशांनी आपापल्या स्पर्धा स्थगित केल्या तर काहींनी लांबणीवर टाकल्या. त्यातही ज्या देशांमध्ये हा धोका जास्त होता त्यांनी यंदाच्या मोसमातील सर्व स्पर्धा रद्दच केल्या. मात्र, आता युरोपातील काही देशांमध्ये हा धोका जवळपास नाहीसा झाल्याने जर्मनीतील बुंदेसलीगा तर स्पेनमधील ला लीगा फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यात आली. आता त्या पाठोपाठ इंग्लंडमधील अत्यंत मानाची इपीएल स्पर्धादेखील आता येत्या 17 जूनपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना मॅंचेस्टर सिटी विरुद्ध आर्सेनल तर, दुसरा सामना ऍस्टन व्हिला आणि शेफील्ड युनायडेट या संघामध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा मार्चमध्येच सुरू झाली होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने साखळीतील काही सामन्यांनंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.
आता जवळपास 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेच्या आयोजकांनी घेतलेल्या बैठकीत सर्व संलग्न क्लबनी स्पर्धा सुरू करण्यास मान्यता दिली. या स्पर्धेशी संबंधित जवळपास 2 हजार व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली होती, त्यातील 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, तरीही ही स्पर्धा सुरू करण्याचा अट्टहास कशासाठी अशी टीका आता सुरू झाली आहे.