सातारा -राज्यात कोविड लसीकरण मोहिमेत सातारा जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्याला लसींचे सर्वाधिक एक लाख 53 हजार 800 डोस मिळाले आहेत. त्यामध्ये कोविशील्डचे एक लाख 47 हजार 400 आणि कोव्हॅक्सिनचे सहा हजार 400 डोस आहेत.
जिल्ह्यात उद्या, दि. 8 रोजी महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी लसीकरण केंद्रांची संख्या 350 हून अधिक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून करोना लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. एकाच दिवसात 60 हजारांहून अधिक लोकांच्या लसीकरणाचा विक्रमही जिल्ह्यात झाला होता. त्यानंतर लसीचा पुरवठा कमी झाल्याने मोहीम मंदावली होती.
आता गेल्या काही दिवसांत लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहीम पुन्हा वेग घेत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून जिल्ह्याला आतापर्यंत सर्वाधिक 90 हजार डोस मिळाले होते. आता दीड लाखांहून अधिक डोस मिळाल्याने महालसीकरण अभियान राबवले जाणार असल्याचे गौडा यांनी सांगितले. सातारा, कराड, वाई, फलटण, कोरेगाव या पाच शहरांमध्ये ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच लस दिली जाणणार आहे.
जिल्ह्यात बुधवारी होणाऱ्या महालसीकरण अभियानात नागरिकांनी गर्दी करू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे.
डॉ. प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग