नगर – शहरातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व सलून असोसिएशनच्यावतीने आज नगरमध्ये “धोबटी’ आंदोलन करण्यात आले. नगरमधील पानसरे गल्लीतील श्री संत सेना महाराज मंदिरासमोरील या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप वाघमारे, राजेंद्र ताकपिरे आदी सहभागी झाले होते.
तत्पूर्वी सलून असोसिएशनच व महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने सलून व्यवसाय 23 मार्चपासून बंद आहे. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली. असे असले तरी नाभिक समाजाने शासनास सहकार्य करुन आपले व्यवसाय आजवर बंद ठेवले आहेत. मात्र, आता परवानगी द्यावी लागेल, अशी भूमिका महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष भुजबळ म्हणाले, शासनाने सलून चालक-मालक व कारागिरांना आर्थिक मदत द्यायला हवी. त्यातही आता “धोबटी’ आंदोलनाची दखल घेतली गेली नाही, तर संपूर्ण राज्यातील मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन आंदोलने अधिक तीव्र करण्यात येईल.” जिल्ह्यातील सलून व्यवसायिकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असल्याचे भुजबळ म्हणाले.