पिंपरी (प्रतिनिधी) – देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा 15 तारखेला सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे खासगी शाळांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांनी देखील त्यामध्ये मागे न राहता आता विद्यार्थ्यांना 15 तारखेपासून अभ्यासाचे ऑनलाइन धडे देण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी महापालिका शिक्षण विभागाने केली आहे.
व्हॉट्सऍप, यू ट्यूब, शिक्षकांचे ब्लॉग्ज आदी माध्यमातून ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. “रेडिओ कम्युनिटी’ अंतर्गत शिक्षकांकडूनच संचालित एफएम चॅनेलद्वारे ऑडिओच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे.
आवश्यकता वाटल्यास स्थानिक केबल चॅनेलच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या 105 प्राथमिक तर, 18 माध्यमिक शाळा आहेत. दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू होतात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचे अद्याप कोणतेही आदेश नाहीत. तथापि, 15 जूनच्या पुढे ऑनलाइन माध्यमातून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
महापालिकेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आणि शिक्षकांचा “तंत्रस्नेही’ हा व्हॉट्सअप ग्रुप सध्या सुरू आहे. तसेच, महापालिका शिक्षकांनी पालकांचे स्वतंत्र व्हॉट्सऍप ग्रुप तयार केले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्यासाठी इयत्तानिहाय कार्यक्रम तयार केला आहे. तंत्रस्नेही व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून त्याचे नियोजन केले जात आहे. शिक्षकांनी तयार केलेल्या पालकनिहाय ग्रुपवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या लिंक, यूट्यूबवरील गोष्टी, गाणी यांच्या लिंक्स शेअर केल्या जाणार आहेत.
मुख्याध्यापकांची गुरुवारी बैठक
महापालिका शाळांमध्ये 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी (दि. 11) सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पिंपरीतील उन्नत केंद्रात दोन सत्रांमध्ये बैठक बोलाविली आहे. त्या वेळी त्यांना विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अभ्यासाचे प्रात्याक्षिक दाखविले जाणार आहे.
“महापालिका शाळांमध्ये 15 तारखेपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्याची सर्व पूर्वतयारी केली आहे. शिक्षक-पालकांचे इयत्तानिहाय व्हॉट्सऍप ग्रुप, शिक्षकांचे ब्लॉग्ज बनविले आहेत. रेडिओ कम्युनिटीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. तसेच, आवश्यकता वाटल्यास स्थानिक केबल चॅनेलच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे नियोजन आहे.”
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका.