वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जो बिडेन यांना नुकतीच अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानंतर बिडेन यांनी आक्रमकपणे प्रचाराला सुरूवात केली आहे. ट्रम्प यांच्या अकार्यक्षम व दुर्लक्षित कारभारामुळेच आज लक्षावधी अमेरिकन अडचणीत आले असून त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
बिडेन यांच्या प्रचार समितीने म्हटले आहे की ट्रम्प यांना अमेरिकेच्या विस्तारीत अर्थव्यवस्थेचा वारसा लाभला होता, पण ट्रम्प यांनी त्याचा बोजवारा उडवला. आज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाल्याचा अहवाल आला आहे तो करोनाच्या आधीच्या काळातील आहे. ट्रम्प यांनी देशातल्या मध्यमवर्गाकडे पाठ फिरवली आहे असा आरोपही या समितीने केला आहे.
मध्यमवर्गींना दिलासा देण्याऐवजी ट्रम्प यांनी केवळ देशातील श्रीमंत वर्गाचे हित साधले आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांनी करसवलती दिल्या आहेत. छोट्या व्यावसायिकांसाठी राखीव असलेला निधी ते उद्योजकांकडे वळवत आहेत. अमेरिकेतील अनेक बड्या उद्योगसमूहांना बेलआऊट पॅकेज देऊन त्यांना ट्रम्प यांनी आर्थिक मदत दिली पण त्यांनी गरजूंना मात्र वाऱ्यावर सोडले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत करोना आला त्याला अध्यक्ष ट्रम्प जबाबदार नसले तरी त्यांनी त्याच्या प्रसाराला रोखण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत त्यामुळेच देशात लक्षावधी लोक करोनाला बळी पडले आणि लक्षावधी लोकांना रोजगाराला मुकावे लागले आहे असा आरोपही बिडेन यांच्या प्रचार समितीने केला आहे.