मंचर – मंचर शहरात पुणे नाशिक महामार्गलगत साइडपट्ट्या सार्वजनिक बांधकाम विभागाने भरण्याची जबाबदारी असताना त्यांनी हात झटकल्याने अखेर मंचर नगर पंचायतीने मुरूम टाकून साइडपट्ट्या भरल्याने अपघात टाळण्यासाठी मदत होणार आहे. पुणे नाशिक महामार्ग मंचर शहरातून गेला आहे. सध्या बायपास रस्ता सुरू झाल्याने बहुतेक वाहने या रस्त्याचा उपयोग करतात. मात्र, एसटी बस व स्थानिक वाहनांसाठी मंचर शहरातून गेलेला जुना रस्ता महत्त्वाचा आहे.
या रस्त्याच्या साईडपट्ट्या अनेक दिवसांपासून भरलेल्या नाहीत. मागील वर्षी जोरदार पाऊस पडला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी साइडपट्ट्या वाहून गेल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित खात्याकडून साईपट्ट्यांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा असतानाही वर्षभर हे काम झाले नाही. डांबरी रस्ता उंच झाला असून, लगतचा रस्ता खोल गेला आहे, त्यामुळे रस्त्यालगत खोलगट भाग झालेला आहे. परिणामी अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्यावरून गाडी घसरून दुचाकी चालक पडले आहेत.
याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बेंडे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. बायपास रस्ता चालू झाल्यामुळे शहरातील या रस्त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता सुद्धा महत्त्वाचा आहे, पण मंचर शहरात पुणे नाशिक महामार्गालगत असणाऱ्या साईडपट्ट्या सार्वजनिक बांधकाम विभागाने भरलेल्या नाहीत. अखेर होणारे अपघात टाळण्यासाठी मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी स्वत: लक्ष घालून मुरूम टाकून साइडपट्ट्या भरल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
पुणे नाशिक मंचर शहरातून जाणाऱ्या हमरस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्या नसल्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. महामार्ग लगतच्या साईटपट्ट्या मंचर नगर पंचायतीने भरल्या आहेत. – स्वप्निल बेंडे, ग्रामपंचायत माजी सदस्य, मंचर