आळंदी – शालेय अभ्यासक्रमासोबतच संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी ओळख ज्ञानेश्वरीची एक संस्कारक्षम उपक्रमाचे तिसरे पर्व सुरू होत आहे. गेली दोन वर्षे आळंदीपुरता मर्यादित राहिलेला उपक्रमास आता जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांसह अनेक मराठी शाळांकडून प्रतिसाद येत असून, 75 शाळा यंदाच्या वर्षी हा उपक्रम आपापल्या शाळेत राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी दिली.
आळंदीत ज्ञानेश्वर चरित्र समिती आणि ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. अजित वडगावकर, दीपक पाटील, नरहरी चौधरी, दीपक मुंगसे, विश्वंभर पाटील, श्रीधर घुंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर काळे व वडगावकर यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे आळंदीतील संत ज्ञानेश्वर विद्यालयात ओळख ज्ञानेश्वरीची एक संस्कारक्षम उपक्रम नावाखाली हरिपाठ, ज्ञानेश्वरीवर आधारित शालेय मुलांना शिक्षण दिले जाते.
संपूर्ण मोफत आणि विद्यार्थ्यांना ऐच्छिक पद्धतीने गेली दोन वर्षे उपक्रम राबविला जात आहे. यासाठी सुभाष गेठे, उमेश बागडे, भागवत साळुंखे, श्रीधर घुंडरे हे शिक्षक विद्यार्थ्यांना सांप्रदायिक ज्ञान देण्याचे काम करीत आहेत. चौथी ते सहावीपर्यंत हरिपाठ पाठांतर व सातवी आठवीसाठी हरिपाठ अर्थ विवेचन, ज्ञानेश्वरीबाबत शिक्षण दिले जाते. गेली दोन वर्षे या उपक्रमास पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम दोन वर्षभरापूर्वी सुरू केला. विद्यालयात रविवारी सुटीचा वार असूनही विद्यार्थ्यांनी आवड लागली. त्यामुळेच रविवारी ते उपस्थिती दाखवीत आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीबरोबरच हरिपाठ आणि मोफत चहा, नाष्टा देण्यात येतो. शालेय पाठ्यपुस्तकातील शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाची जोड देण्याचा प्रयत्न आहे.
शैक्षणिक साहित्य चरित्र समिती देणार
यंदा तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविताना जिल्ह्यातील 75 शाळांकडून प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या सोळा शाळांनी उपक्रम राबविण्याबाबत अनुकूलता दाखविली आहे. सुरुवातील हा तृतीय वर्षाचा उपक्रम ज्ञानेश्वर विद्यालयात केला जाणार आहे. तर इतर शाळांमध्ये त्यानंतर दहा दिवसांमध्ये एकाच वेळी केला जाईल. यासाठीचे शैक्षणिक साहित्य ज्ञानेश्वर चरित्र समितीकडून पुरविले जाणार असल्याची माहिती काळे आणि वडगावकर यांनी दिली.