मंचर (प्रतिनिधी) – मंचर नगरपंचायतने केलेली अवास्तव करवाढ सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे. नगरपंचायतीने केलेली करवाढ मागे घ्यावी .अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी दिला.
नुकतीच मंचर नगरपंचायतने चालू आर्थिक वर्षात सदनिका तसेच व्यावसायिक गाळ्यांच्या करात अवास्तव करवाढ केली आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या काळात सदनिकांना/ पक्क्या घरांना प्रति चौरस फूट दर हा दीड रुपया असल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडत नव्हता.
परंतु मंचर नगरपंचायतीने नुकतीच सदनिकांचे तसेच व्यापारी गाळे व इमारतींच्या कर आकारणीत आवास्तव करवाढ केली आहे. आता सदनिकाधारकांना प्रति चौरस फूट चार रुपये छत्तीस पैसे भरावा लागणार असून या सोबतच पाणीपट्टीचा वेगळा कर, असे सर्व मिळून प्रति चौरस फूट अंदाजे सहा रुपये बारा पैसे भरावे लागणार आहे. त्यामुळे एकप्रकारे चारपट जास्त कर भरावा लागणार असल्यामुळे भिक नको पण कुत्र आवर असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.
गोठ्यावरही कर…
मंचर नगरपंचायतीने वाढवलेल्या करांबाबत सामान्य नागरिकांचे शंकांचे निरसन करावे तसेच मंचर नगरपंचायत वाड्या वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांनी बांधलेल्या जनावराच्या गोठ्यावर व बखळ जागा समजून शेत जमिनीवर देखील आकारणी केली आहे. ती कर आकारणी तात्काळ मागे घेण्यात यावी,अशी मागणी वसंतराव बाणखेले व अॅड. अमर कराळे यांनी केली.