घरकूल वंचितांच्या शिष्टमंडळाने घेतली ना. विखेंची भेट

लॅण्ड पुलिंगद्वारे घरकूल वंचितांना 600 चौ. फुटांचा भूमीगुंठा देण्याची मागणी

नगर – इसळक, निंबळक (ता. नगर) येथील खडकाळ पडिक जमिनीवर हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजनेचा वापर करुन, शहरासह उपनगरातील घरकूल वंचितांना 600 चौ. फुटाचा भूमीगुंठा मिळण्याची मागणी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. घरकूल वंचितांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ऍड.कारभारी गवळी यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे विखे यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, बाबा आंबेडकर आदी उपस्थित होते.

शहरा शेजारील खडकाळ माळरानाच्या पड जमीनवर हायब्रीड लॅण्ड पुलिंगचा वापर करुन घरकुले बांधावी, पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत होण्यासाठी हायब्रीड टाऊनशिपद्वारे शहरांशेजारी नवे उपनगर उभारुन घरकूल वंचित आणि झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करावे, सरकारी खर्चाशिवाय आणि सरकारी जमिनी शिवाय लॅण्ड पुलिंगद्वारे घरकूल वंचितांना 600 चौरस फुटांचा प्लॉट देण्याची आग्रही मागणी गृहनिर्माण मंत्री विखे यांच्याकडे करण्यात आली. या मागण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे विखे यांनी यावेळी आश्‍वासन दिले. माजी खा. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली घरकुल वंचितांचे शिष्टमंडळ मुंबई येथे मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री विखे यांची भेट घेण्यासाठी लवकरच जाणार असल्याची माहिती ऍड. गवळी यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतर देखील देशातील कोट्यवधी लोकांना निवारा नाही. अशा घरकूल वंचितांना निवारा मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन गेल्या पाच वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे. संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली आहे. हायब्रीड लॅण्ड पुलिंग तंत्राचा वापर केल्यास सरकारला शासकीय जमीन न देता व तिजोरीवर आर्थिक बोजा न पडता घरकूल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लावता येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून मूळ जमीन मालकांना रस्ता, गटारीसाठी सोडलेल्या 30टक्के जमिनी व्यतिरिक्त विकसित जमीनीचा 50टक्के भाग परतावा म्हणून देण्याची मागणी संघटनेने पुढे केली आहे. घरकूल वंचितांना भूमीगुंठा मिळाल्यास केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 2 लाख 67 हजार रु. चे अनुदान व बॅंकेचे कर्ज घेऊन त्यांची घरे साकार होणार आहे. इसळक, निंबळकच्या 300 एकर जमिनी शेतकरी स्वतः हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजनेकरिता देण्यास तयार आहे. या ठिकाणी शहर व उपनगरातील घरकूल वंचितांना प्लॉट देणे शक्‍य होणार आहे. म्हाडा, सिडको किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ठरलेल्या वेळेत याबाबतचे आराखडे तयार करून टाउनप्लॅनिंग योजना राबविण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)