आत्माज्ञान प्राप्त करून घेतलेली पदवी नष्ट होत नाही

आत्मा मालिक ध्यानपीठात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी सुरू

प्लॅस्टिकमुक्त उत्सव होणार साजरा

प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, उत्सव काळात प्लॅस्टिक न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसादाचे पाकीट, भोजणासाठी लागणाऱ्या पत्रावळ्या व इतर कुठलेही प्लॅस्टिकचे साहित्य वापरण्यात येणार नाही. प्लॅस्टिक मुक्त गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन हा गुरुपौर्णिमा उत्सवाचा अनोखा संदेश दिला जात आहे.

कोपरगाव – माणसाने शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध पदव्या घेतल्या, तरीही त्या ठराविक कालावधीनंतर निकामी होतात. मात्र आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेतलेली पदवी हजारो वर्ष नष्ट होत नाही. ज्यांना आत्मा कळाला, ते आजही अजरामर आहेत. भगवंताची ओळख करून घेण्यासाठी सर्वप्रथम स्वत: अंतरात्म्याचे चिंतन केले पाहिजे, असे प्रतिपादन विश्‍वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक पीठाचे प्रमुख ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांनी केले.

कोपरगाव तालुक्‍यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यान योग मिशन, आत्मा मालिक ध्यानपीठ या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाची माहिती देताना जंगलीदास महाराज बोलत होते. यावेळी आत्मा मालिक ज्ञानपीठाचे संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत निजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष भगवान दौंड, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोरडे, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमदाडे, माधवराव देशमुख, आबासाहेब थोरात, प्रकाश गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुपौर्णिमा आत्मशक्तीचा उत्सव आहे. आत्मा हा सद्‌गुरू असून, तो प्रत्येकांच्या हृदयामध्ये निवास करतो. पौर्णिमा म्हणजे आत्मशक्तीचा प्रकाश व ज्ञान सद्‌गुरूकडून शिष्याला प्राप्त होते. त्या शाश्‍वत प्राप्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिन म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर माऊलींचे दर्शन, भेटीसाठी लाखो भाविक देश-विदेशातून येत असतात. प्रत्येक मनुष्याच्या हृदयात नांदणारा आत्मा हाच परमेश्वर ही शिकवण माऊलींनी दिली आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांचे आदरातिथ्य होणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन आत्मा मालिक ध्यान-योग मशीनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी व्यक्त केली.

आत्मा मालिक ध्यानपीठात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची माहिती देताना सरचिटणीस भोंगळे म्हणाले, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट येथे 14 जुलै ते 16 जुलै 2019 दरम्यान तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी झाली असून, सत्संगासाठी 85 हजार चौरस फूट, महाप्रसादासाठी 75 हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला असून, भाविकांना अद्ययावत सुविधा देण्यात येतील. भक्तांसाठी निवास, महाप्रसाद, स्वागत दर्शन, वाहन व्यवस्था, सत्संग, वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी 18 समित्यांची निवड केली आहे. उत्सव काळात 24 तास अन्नदानाचे काम सुरू राहणार आहे. महाप्रसाद म्हणून 51 पोती साखरेचा बुंदी प्रसाद तयार करण्यात आला आहे. या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सुमारे दोन ते तीन लाख भाविक सत्संग महाप्रसादाचा लाभ घेतील.

उत्सवादरम्यान संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत ग्यानीजी महाराज, भगवती प्रसाद तिवारी, डॉ. कल्याण गंगवाल, पंडित आनंद महाराज, श्‍याम सुतार, संत सिद्धनाथ महाराज, संत गाडगे महाराज, संत सागरनंद महाराज, संत कबीर महाराज, शांतीमाई, प्रभावती माई, इतर संत गण आत्मप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. विश्वस्त प्रकाश भट, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, प्रकाश गिरमे यांच्याकडे प्रसादाची व्यवस्था सोपविण्यात आली आहे. उत्सव काळात गुरुमाऊलींच्या सेवेसाठी आपली विविध प्रकारची सेवा देण्याचे काम हजारो विद्यार्थी, शिक्षक वृंद, सेवेकरी भक्तगण हे करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.