पिंपरी – सुमारे दोन महिन्यांनंतर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा दहाच्या आत आला आहे. रविवारी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांमध्ये पालिकेकडे करोनामुळे झालेल्या 9 मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यापैकी केवळ दोनच मृत्यू गेल्या 24 तासांमधील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे पूर्वीचे असून त्याची रविवारी नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत शहरातील 219 नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आतापर्यंत शहरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा 2 लाख 53 हजार 932 इतका झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 426 जण करोनामुक्त झालेल्या असल्याने आतापर्यंत शहरातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 47 हजार 602 इतकी झाली आहे. 9 मृत्युंच्या नोंदीमुळे आतापर्यंत शहरातील एकूण 4223 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 1743 तर गृहविलगीकरणात 364 असे एकूण 2107 करोना रुग्ण उपचाराधीन आहे.
जिल्हा रुग्णालयामध्ये करोनाने एकाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात 34 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला. नारायणगाव येथील ते रहिवासी आहेत. रुग्णालयामध्ये सध्या 14 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत एकूण 1371 बाधित रुग्ण आढळले आहेत त्यातील 352 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. 2067 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 353 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मावळात पुन्हा रुग्णवाढ
मावळ तालुक्यातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. मावळ तालुक्यात रविवारी (दि.13) 53 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी एकही रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला नाही. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 651 आहे. शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 35 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2 रुग्ण सापडले, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,826 झाली आहे. तर दिवसभरात 47 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.