स्वातंत्र्याची पहाट

ध्वजारोहण पार पडलं. राष्ट्रगीत झालं. झेंड्याला वंदन करून मी निघालो. चौकाचौकात ध्वजारोहणाचे सोहळे पार पडत होते. राष्टगीत ऐकू येत होते. ध्वजाला सलाम केले जात होते. वातावरणात एक उत्साह संचारलेला होता. त्यामुळे अंथरुणात मश्‍गुल असणाऱ्या मंडळींचा विचार करत बसण्याची मला फारशी गरज वाटली नाही. एका प्राथमिक शाळेसमोरून चाललो होतो. एकसारखा ड्रेस असलेली चिमुकली मुलं एका ओळीत उभं राहून झेंड्याला वंदन करत होती. आणखी पुढे गेलो. एक महाविद्यालय दिसलं. ध्वजारोहण पार पडलं होतं. बाकी शुकशुकाटच होता. पुढे जात असताना एक माध्यमिक विद्यालय लागलं. उपस्थिती तशी कमीच होती. पण उपस्थित मुलं कवायतीत रमली होती. त्या मुलांकडे पाहताना मला आमच्या बालपणीचं ध्वजारोहण आठवलं.

झेंडा वंदनासाठी जायचं होतं. जाग आली होती. डोळ्यावरचं पांघरूण दूर केलं. खिडकीतून बाहेर नजर टाकली. उजाडलं होतं पण पहाटेची लाली इमारतींच्या भिंतींवर पसरलेली नव्हती. कानोसा घेत होतो. आणि तेवढ्यात कुठूनतरी “जहॉं डाल डाल पर सोने की चिडियॉं, करती है बसेरा,’ हे गाणं कानावर पडलं. स्वातंत्र्याची पहाट उगवल्याची जाणीव झाली. संपूर्ण गाणं ऐकायला मिळेल म्हणून मी झोपेतच कान टवकारून, कानात प्राण आणून शब्द झेलण्याच्या तयारीत होतो. पण काहीच ऐकू येईना. बहुदा परिसरातील नागरिकांच्या साखरझोपेत मिठाचा खडा नको म्हणून संबंधितांनी ट्रायल घेऊन, सगळी सिस्टीम नीट सुरू आहे की नाही, याची खातरजमा करून स्पीकर बंद केला असावा. या गाण्यांमुळे आमची झोपमोड झाली अशी कोणी तक्रार केली तर उगाच बलामत नको म्हणून स्पीकर बंद केले असावेत.
माझे आवरले तेव्हा सात वाजले होते. गाणी पुन्हा सुरू झाली होती. मी चौकात पोहचलो. तिथे पाचपंचवीस नागरिक उपस्थित होते. खरंतर परिसरात दीड दोन हजार नागरिकांचा रहिवास. पण उपस्थिती नगण्य. त्यातही भरणा जेष्ठांचाच अधिक. एखादे दुसरे आजोबा नातवंडाला हाताशी धरून घेऊन आलेले. तोच काय तो आशेचा किरण. दोन-चार महिलाही उपस्थित होत्या. चार-सहा तरुण सुद्धा दिसत होते त्या गर्दीत. पण बाकीची तरुण पिढी अंथरुणातच स्वातंत्र्याचा आनंद चाखण्यात मश्‍गुल झाली असावी.

काहीजण अंथरुणात पडल्या पडल्याच आजची सुट्टी कशी घालवायची? या विवंचनेत बुडून गेलेले असावेत. रोज नाही पण कमीत कमी अशा दिवशीतरी किती जणांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या शूरवीरांच्या बलिदानाचं स्मरण होत असेल? किती जणांना “ने मजसी ने परत मातृभूमीला’ असं म्हणत मातृभूमीच्या भेटीसाठी सागराला आळवणी करणारे सावरकर, “स्वराज्य हा माझा, जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ असं इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, किती जणांच्या लक्षात असतील? किती जणांना आठवत असेल म. गांधीजींचा “मिठाचा सत्याग्रह’ आणि “चले जाव’ची चळवळ? “इतिहास’ हा फक्त कंठशोष करून मार्क मिळविण्यापुरताच उरणार आहे का? इतिहासाकडून प्रेरणा घेऊन देश बलशाली होण्यासाठी काय करतो आहोत आम्ही?

“आमच्या राजवटीत तुम्हाला राहायचे असेल तर कर द्यावा लागेल.’ असे म्हणत, मुगल राजवटींनी बिगर मुस्लिम जनतेवर लावलेला अमानवी जिझिया कर आठवतो आहे का कुणाला? मीठ देणारा समुद्र. पण समुद्रापासून मिळणाऱ्या आणि आयुष्य चवदार करणाऱ्या मिठावर इंग्रजांनी लावलेला टॅक्‍स माहीत आहे का आपल्याला? आपण स्वातंत्र्याचं सुख अनुभवतो आहोत. पण पारतंत्र्यातील दुःखाची जाणीव नाही आपल्याला. आपल्या पंखात भरारी घेण्याचं बळ आहे, याचा विसर पडलेल्या पोपटाला चोचीसमोर पडणाऱ्या आयत्या डाळिंबाच्या दाण्यात सुख वाटत असतं. पण स्वातंत्र्याची किंमत कळते ती आभाळात भरारी घेणाऱ्या पाखराला. आपण मात्र स्वातंत्र्याचा अर्थ केवळ अभिव्यक्तीपुरता, विचारस्वातंत्र्यापुरता, आचार स्वातंत्र्यापुरता, भाषण स्वातंत्र्यापुरता मर्यादित करून ठेवला आहे.

आमच्या लहानपणी शाळांच्या प्रभातफेऱ्या निघायच्या. शाळेतल्या मुलांचं बॅंड पथक सर्वात पुढे असायचं. त्यांच्या मागून दोन, तीन अथवा चार मुलांच्या जोड्या एकामागून एक चालत असायच्या. गावातली मंडळी रस्त्यावरून, आपापल्या दारातून, माडीच्या गच्चीतून आपली मुलं कुठे दिसतात का ते पाहत असायचे. आईवडील दिसले की फेरीतूनच त्यांना हात करताना आपणच स्वातंत्र्याचा गाडा हाकत असल्यासारखं वाटायचं. प्रभातफेरीच्या हरवलेल्या चित्रात रमून गेलेलो मी माझ्याच तंद्रीत चालत राहिलो. एका चौकात कळकट मळकट कपड्यातली एक मुलगी झेंडे विकत होती. आणि एक माणूस दहा रुपयाचा झेंडा पाच रुपयाला मागत होता. त्याने तो घेतला नसता तरी मला फार काही वाटलं नसतं. पण स्वतंत्र भारतात आपण ध्वज घेतो आहोत भाजीपाला नव्हे हे त्याच्या लक्षात कसं येत नव्हतं? या विचाराने मी सैरभैर झालो होतो…

विजय शेंडगे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.