वयं मोठं स्वीटम्‌

मनपाच्या बसमध्ये डावी बाजू स्त्रियांसाठी राखीव असते. दोन ते चार आसने ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी राखीव असतात. खोटं का बोला. ज्येष्ठांसाठी राखीव आसनं बघून कोणे एके काळी ज्येष्ठांविषयी मला असूया वाटायची. तसा मी खूप मत्सरी माणूस आहे. शाळेत असताना सायकलवरून शिट्ट्या वाजवत जाणाऱ्या कॉलेजच्या मुलांवर जळायचो. कॉलेजात गेल्यावर नोकरी करणाऱ्या आणि खिशात रग्गड पॉकेटमनी बाळगणाऱ्या नवनोकरदारांवर खार खायचो. नोकरी लागली तेव्हा लग्न झालेल्या आणि ऑफीस सुटल्यावर सपत्नीक फिरायला जाणाऱ्या जोडप्यांविषयी मत्सर वाटायचा. इंग्रजीत म्हणतात ना, पलीकडच्या कुरणातलं गवत अधिक कोवळं हिरवंगार आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. तर ज्येष्ठांविषयी असूया बाळगता बाळगता एक दिवस मी देखील ज्येष्ठ झालो. माझा कचेरीतला सहकारी गोट्या आणि मी एकाच दिवशी निवृत्त झालो. आम्ही बसचा मासिक पास काढला. सकाळची जेवणं झाली की दुपारच्या वेळी वामकुक्षी न घेता टाईमपास करत बसने हिंडू लागलो. ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसनावर बसलेल्या लोकांना खडूसपणे उठवू लागलो.

एकदा आम्ही दोघे बसने चाललेलो. बस गच्च भरली होती. आम्ही पुढच्या बाजूला उभे होतो. आमच्यासाठी राखीव असलेल्या आसनांवर एक युवा जोडी बसलेली होती. त्याच्या हातातल्या मोबाइलवर कुठली तरी चित्रफीत चालू होती. मोबाइलला जोडलेल्या हेडफोन्सपैकी एक बोंडूक त्याच्या आणि दुसरं तिच्या कानात कोंबलेलं होतं. दोघं एक क्षण मोबाइलकडं आणि तीन क्षण एकमेकांकडं जादुई नजरेनं बघून मुग्ध होत होते. त्यांना बाह्य जगाचं भान उरलेलं नव्हतं.
गोट्यानं त्यांना शुकशुक केलं. पण ते आत्ममग्न किंवा परस्परमग्न होते.

जाऊ दे रे गोट्या. आपण त्यांना उठवून घायाळ केलं तर आपल्याला शाप लागेल हं. पूर्वी एक कावळा आणि चिमणी असे प्रेम करताना व्यास ऋषींनी असंच डिस्टर्ब केलं होतं, तर त्यांना सॉलीड शाप लागला, मी म्हणालो.
व्यास नाही बे. वाल्मिकी ऋषी. आणि चिमणी-कावळा नाही काही, ते क्रौंच नावाचे पक्षी होते. त्यांना वाल्मिकीनी काही केलं नाही. त्यांना बाण लागून ते मेले. तेव्हा वाल्मिकी फक्त दुःखी झाले.

अशी गोष्ट आहे काय? पण जाऊ दे. कोणी का असेना. मला काय वाटतं, सांगू? आपण यांना उठवू शकत नाही. हे जरी तरुण दिसत असले तरी माझ्या मते हे आपल्याच वयाचे असतील. त्या कुठल्या चिंतातुर साबणाने त्यांनी आंघोळ केली असेल आणि त्यामुळे तरुण दिसत असतील. त्यात नाही का ती आंघोळ केलेली बाई नाचत असते. सगळे बघत असतात आणि एकदम एक लहान मुलगी धावत येऊन मम्मी असं ओरडते आणि सर्वांचा पोपट होतो. तुझे तपशील बरोबर आहेत. पण त्या साबणाचं नाव चिंतातुर नाही. काहीतरी वेगळंच आहे. पण तो साबण फक्त लेडीज बायकांचाच आहे. त्या अर्थी ही समोरची स्त्री आपल्या वयाची असेल. तो मात्र तिचा मुलगा असणार बघ. ते दोघे मोबाइलवर श्‍यामची आई किंवा तसलाच मातृप्रेमाची महती सांगणारा सिनेमा बघत असतील.

मग नको त्यांना उठवायला. असं कसं? ती आपल्या वयाची- ज्येष्ठ- असेल तर तिला बसू देत. पण तिच्या मुलाला उठवू आपण. नको. आपल्यातला कोणीही तिच्याजवळ बसला तरी तिला संकोच वाटेल, मी हे बोलत असतानाच कुठलासा स्टॉप आला नि बस थांबली. तिकडं माझं बोलणं ऐकायच्या आधीच गोट्याने त्या मुलाचं बखोटं धरून त्याला गदागदा हलवला. त्या मुलानं एक क्षण गोट्याकडं आणि मग खिडकीतून बाहेर बघितलं आणि तो लगबगीनं उठला. ती देखील उठली. तिने गोट्याकडे बघून एक दिलखेचक स्माईल फेकलं. मग घाईघाईने उठून उभी राहत ती म्हणाली, थॅन्क यू व्हेरी मच, काका. आम्हाला इथंच उतरायचं होतं. पिक्‍चर बघण्याच्या नादात आम्ही पुढं गेलो असतो तर पंचाईत झाली असती.
आणि दोघे उतरून गेले.

(बसमध्ये एवढी गर्दी असताना उतरण्याआधी तिने उपरोक्त वाक्‍ये खरेच उच्चारली का? त्या घाईत एवढं लांबलचक बोलणं शक्‍य असतं काय? वगैरे शंका तुमच्या मनात येतील. पण एवढा मोठा प्रसंग जसाच्या तस्सा वर्णन केल्यावर तिच्या तोंडी दोन काल्पनिक वाक्‍यं लिहिली तर तुमची काय हरकत आहे?)

विजय तरवडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.