पोलीस तरी काय करणार… आपली सुरक्षितता आपल्याच हाती…

गुन्हे करण्यासाठी “सुरक्षित’ जिल्हा, जणू काही असेच मत चोरांच्या मनात रुजले आहे, असेच झाले आहे. रात्री-अपरात्री, दिवसाउजेडी-भरदुपारी, मोठ्या बंगल्यात- फ्लॅटमध्ये, छोट्या घरांत-झोपडीतही सगळीकडे चोरांचा संचार बिनधास्तपणे वाढला आहे. लोक मात्र पोलिसांवर ओरडत राहतात. खरं म्हणजे पोलिस तरी काय करणार, त्यांच्यामागे इतके उद्योग आहेत की या सगळ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्यांना वेळ मिळणे दुरापास्त होत चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनीच आता स्वतःची आणि स्वतःच्या घराची सुरक्षितता राखण्यासाठी सजग राहिले पाहिजे.

जिल्हा पोलीस दल सक्षम आहे. पोलीस दलाचा लौकिकही आहे. विविध वेळा जिल्ह्यातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरीही केली आहे. कायदा व सुव्यवस्थेबाबतीत फार गंभीर परिस्थिती या जिल्ह्याने क्वचितच अनुभवली असेल. पण अशा काही किरकोळ गुन्ह्यांमुळे पोलीस दलाविषयी गैरसमज करून घेणेही योग्य नाही. गेल्या काही महिन्यांपासून तर विविध उपक्रमांतून जिल्ह्यातील पोलिसांनी जनतेशी सुसंवाद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांविषयी सर्वसामान्यांच्या मनात विश्‍वास निर्माण व्हावा, असेच हे उपक्रम आहेत.

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कराटे प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन असेल किंवा शस्त्र प्रदर्शन. ग्राम सुरक्षा दलाची उभारणी असेल की मायणी परिसरातील भोंग्याचा (सायरन)उपक्रम असेल, लोकांच्या सहकार्याने सुरक्षितता मजबूत करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याचेच लक्षात येते. पोलिसांचे मनोबल वाढविणारे उपक्रम राबविले जात आहेत. वाढदिवसादिवशी पोलिसांना शुभेच्छापत्रेही मिळू लागली आहेत. त्यांच्यासाठी कॅंन्टीनचे उदघाटनही नुकतेच झाले आहे. पोलिसांच्या क्रीडा स्पर्धेतही जिल्हा दलाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळेच सक्षम अशा पोलीस दलाकडून गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्याबाबतची अपेक्षा वाढत जाते. पण या सगळ्या उपक्रमाबरोबरच बंदोबस्तांचा ताणही खूप मोठा असतो.

विविध सणसभारंभ सातत्याने सुरू असतात. जिल्हा राजकीयदृष्ट्या जागृत असल्यामुळे नेत्यांचे दौरेही मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यांच्या बंदोबस्तांचा ताण आणखीनच विचित्र असतो. रस्त्यावर दिवसरात्र उभे राहून हा बंदोबस्त करताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेची कल्पना आपल्याला करता येणेही शक्‍य नाही. बिचाऱ्यांना कधीकधी घराकडे जायलाही फुरसत मिळत नाही, अशा अवस्थेत पोलिस दल काम करीत आहे. तरीही लोक पोलिसांना दोष देत असतात. गेल्या काही महिन्यांत दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना, चोऱ्या, घरफोड्या, दरोडे अशा गुन्ह्यांच्या घटना वाढत आहेत. पुसेसावळी व साखरवाडी येथील बॅंकांच्या शाखांमधून मोठ्या रकमा लांबविण्याचे प्रकारही धक्कादायक ठरले.

महिला व मुलींविषयक गुन्हे वाढत आहेत. त्या तुलनेत गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. हे सारे खरे असले तरीही आता लोकांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी हेही तितकेच खरे आहे. भले गृह राज्यमंत्रिपद जिल्ह्यात मिळू दे. ते मिळाले म्हणून “गप्प बसा,’ असे चोरांना कसे सांगणार, हा प्रश्‍नही आहेच. मुख्यमंत्री महाबळेश्‍वरमध्ये आले आणि मोठा बंदोबस्त असला तरी तिथली दुकाने फोडली जातात.

हे चुकीचे असले तरी खरे तर ते चोरांच्या लक्षात आले पाहिजे. मोठे नेते जिल्ह्यात असाताना असे गुन्हे करून नयेत, असे आता चोरांच्या मनात बिंबवण्याची गरज निर्माण झाली आहे. पण हे सारे करणार कोण, हा प्रश्‍नही आहेच. असो. एकूण काय तर लोकांनीच आता आपली सुरक्षा आपणच करण्याची वेळ आली आहे. उगाचच पोलिसांवर खापर फोडण्यात काहीही अर्थ नाही. केवळ पोलिसच नव्हे तर सर्वसामान्यांची लूट सर्वत्रच सुरू आहे.

कोणत्याही सरकारी कार्यालयात कामासाठी गेल्यावर काय होत असते? ती लूटच. कोणतेही काम पैसे दिल्याखेरीज होत नसतेच. त्यामुळे सर्वसामान्य माणूस लुटण्यासाठी योग्य आहे. लुटण्यासारखे तुमच्याकडे काही तरी आहे, यातच त्याने धन्यता मानावी. सर्वसामान्य माणसाला असेच जगावे लागते. हे गृहित धरूनच आपण आपल्या जगण्याचे नियोजन करायला हवे. बिचाऱ्या पोलिसांना कशाला दोष देऊन तरी तुमचे जगणे सुखावह होईल, याची ही खात्री उरलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.