लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी पुरवणे अशक्य
पुणे – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी दि. १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे.
राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे चाचणीसाठी पोलीस अधिकारी, तसेच इतर मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी एमपीएससीला कळवले आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित सविस्तर कार्यक्रम एमपीएससीच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यातील हजारो उमेदवार पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी प्रयत्नशील असतात. २०२१च्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या भरती परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तीन वर्षांनी जाहीर करण्यात आली आहे. आता २०२२च्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे आता या भरतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उमेदवारांना दिलासा…
बालगंधर्व रंगमंदिर येथे पाच दिवसांपूर्वी झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्रमात पीएसआय परीक्षेत पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांनी शारीरिक चाचणी परीक्षेसाठी वेळ अपुरा असून ती वाढवून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनीही याबाबत आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. अखेर चार दिवसांनी आयोगाने शारीरिक चाचणी परीक्षा पुढे ढकलली असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.