Amit Shah’s meeting in Gondia cancelled – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शनिवारी (दि. 6 एप्रिल) गोंदिया येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र ती अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची ही सभा आयोजित करण्यात आली होती. अमित शहा यांची प्रकृती बिघडल्यामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या सभा आणि प्रचार दौरे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोंदीया मध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची तयारी देखील महायुतीतील घटक पक्षांनी केली होती, असे असताना अचानक अमित शहा यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
सभार होणार, तारीख बदलली –
सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहा हे सातत्याने बैठका आणि दौरे करत आहेत. त्यामुळे त्यांना थकवा जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच उद्याची गोंदिया येथील सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सभा होणार आहे मात्र तारीख पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे. आता 12 किंवा 13 एप्रिल रोजी अमित शहा यांची सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
8 एप्रिलला पीएम नरेंद्र मोदींची सभा –
चंद्रपूर लोकसभेसाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवर हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी येत्या 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा होणार आहे. मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने माजी खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघातील जागा रिक्त होती. मात्र, येथे पोटनिवडणूक लागली नाही. या ठिकाणी आता सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. या मतदारसंघांमध्ये 8 एप्रिलला सायंकाळी चार वाजता नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.