चिंचवड, भोसरी भाजपकडे : पिंपरीत राष्ट्रवादीची ताकद वाढली
पिंपरी – महायुतीच्या जागा वाटपात मिळालेली पिंपरीची एकमेव जागा शिवसेनेच्या हातातून निसटली. भाजपने याठिकाणी साथ सोडल्याने शिवसेनेला पराभव स्विकारावा लागल्याची चर्चा आहे. तर चिंचवड व भोसरीतही भाजपच्या विद्यमान आमदारांची सरशी झाली. शहरात एकही आमदार नसल्याने महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आल्यास शिवसेनेसाठी ही बाब धोकादायक ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आजवर शिवसेनेचा भगवा फडकला नसला तरी मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिवसेना होती. महापालिकेच्या 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे 14 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपचे संख्याबळ अवघे 4 इतके होते. त्यावेळी मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे दोन खासदार होते. त्यातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या स्वतंत्र लढतीत पिंपरीत शिवसेनेची सरशी झाली. ऍड. गौतम चाबुकस्वार यांचा विजय झाला. त्यामुळे पिंपरीला शिवसेनेचा पहिला आमदार मिळाला. मात्र, त्यानंतर झालेल्या 2017 च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदार संघात ऍड. गौतम चाबुकस्वार यांना स्वतःचा करिष्मा दाखविता नाही आला.
परिणामी पिंपरीला आमदार मिळूनही नगरसेवकांची संख्या वाढली नाही. भोसरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. अवघ्या नऊ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे 77 जागा मिळवत भाजपने महापालिकेत सत्ता काबीज केली. शिवसेनेच्या घसरगुंडीचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसला. शिरुरची जागा शिवसेनेने गमावली. मावळमधून श्रीरंग बारणे पुन्हा विजयी झाले. मात्र, भाजपची साथ त्यांना घ्यावी लागली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पिंपरीची जागा मिळावी यासाठी भाजपसह रिपाइंनेही गळ टाकला होता. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मात्र, युतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेना सुटला. त्यामुळे भाजप व रिपाइंने चाबुकस्वार यांच्या प्रचारातून अंग काढून घेतले. भाजपचे बहुसंख्य प्रमुख पदाधिकारी केवळ स्टार प्रचारकांच्या सभेत व्यासपीठावर दिसले. परिणामी चाबुकस्वार यांना राष्ट्रवादीचे बनसोडे यांच्याकडून 19 हजाराच्या मताधिक्याने पराभव सहन करावा लागला. बनसोडे यांचे “कमबॅक’ झाल्याने पिंपरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. भोसरीत एकही नगरसेवक नाही आता पिंपरी विधानसभेचीही जागा हातची गेली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कशा पद्धतीने संघटन बांधणी करणार याकडे सर्वसामान्य शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
पिंपरीत शिवसैनिकांचीच नाराजी भोवली?
खासदार श्रीरंग बारणे यांचा वरदहस्त एवढ्या एकाच निकषावर मागील विधानसभा निवडणुकीत ऍड. गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यातच राष्ट्रवादी विरोधातील नाराजी चाबुकस्वार यांच्या पथ्यावर पडल्याने त्यांना आमदारकीची “लॉटरी’ लागल्याची कुजबूज शिवसैनिकांमध्ये होती. आमदार झाल्यानंतरही चाबुकस्वार यांना पक्ष संघटनेत करिष्मा दाखविता आला नाही. चाबुकस्वार यांना उमेदवारी देण्यास शिवसैनिकांचा विरोध होता. काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत चाबुकस्वारांच्या उमेदवारीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली होती. मात्र, हे पत्र “मातोश्री’वर पोहचण्याआधीच खासदार श्रीरंग बारणे यांनी समेट घडवून आणला. मात्र, पक्षांतर्गत नाराजी कायम राहिली. त्याचा चाबुकस्वार यांना फटका बसल्याची चर्चा आहे.