प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांची सरशी

माळशिरस मतदारसंघात भाजपच्या राम सातपुते यांनी मारली बाजी

अकलूज – माळशिरस विधानसभा निवडणुकीत पहिल्या फेरीपासून ते 19व्या फेरीपर्यंत मतमोजणीत आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तम जानकर यांचा 2 हजार 590 मतांनी पराभव करीत भाजपाच्या राम सातपुते यांनी बाजी मारली. जानकर यांचा निसटता पराभव झाला असला तरी ही निवडणूक शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाची सरशी झाली आहे.
माळशिरस येथील म्हसवड रोड येथे असणाऱ्या गोडावूनमध्ये सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. शिंदेवाडी गावापासून मतमोजणी सुरू झाली.

पहिल्या फेरीमध्ये उत्तम जानकर यांना 5 हजार 69 तर राम सातपुते यांना 2 हजार 468 मते मिळाली. पहिल्या फेरीतच जानकर यांनी 2 हजार 601 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी सलग 19 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. 16 व्या फेरीपर्यंत जानकर 12 हजार 667 मतांनी आघाडीवर होते. अकलूज गावची मतमोजणी सुरू झाल्यानंतर जानकरांची मतांची आघाडी कमी होत गेली. 19 व्या फेरीमध्ये जानकरांचे मताधिक्‍य घटून ते केवळ 856 इतके राहिले. त्यानंतर 20 व्या फेरीला जानकरांचे मताधिक्‍य मोडीत काढून सातपुते यांनी 1 हजार 309 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी 24 व्या फेरीपर्यंत सातपुते यांच्याकडे राहिली.

शेवटी 2 हजार 590 मतांनी सातपुते विजयी झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी शमा पवार यांनी घोषित केले. माळशिरस तालुक्‍यात एकूण 3 लाख 20 हाजर 236 मतदारांपैकी 2 लाख 13 हजार 836 मतदारांनी मतदान केले. तालुक्‍यात एकूण 66.77 टक्‍के मतदान झाले होते. त्यापैकी भाजपाच्या राम सातपुते यांना 1 लाख 3 हजार 507 तर राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांना 1 लाख 917 इतके मतदान मिळाले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नोटाला सुमारे 1 हजार 899 इतके मतदान झाले. तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित आघाडीचे राज कुमार यांना 5 हजार 538 मते मिळाली.

विजयानंतर सायंकाळी आमदार राम सातपुते यांना घेऊन धर्यशील मोहिते पाटील शिवरत्नवर दाखल झाले. तेव्हा सगळीकडे गुलालाची उधळण होत होती. येथील सभेला माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

राम सातपुते यांची विजयी सभा
राम सातपुते यांचा विजय हा कट्टर मोहिते पाटील समर्थक व कट्टर भाजपा समर्थकांचा विजय आहे. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर अकलूजमध्ये तणावाचे वातावरण होते. ज्या बातम्या येत होत्या. त्यात जानकर पुढे असल्याचे येत होत्या. 17व्या फेरीपर्यंत राष्ट्रवादी आघाडीवर होती. अकलूज येथील मतमोजणी सुरू झाल्यावर राष्ट्रवादीचे लीड जावून राम सातपुते आघाडीवर आले. ते शेवटपर्यंत आघाडीवर राहिले. केवळ अकलूजच्या मतदारांनीच सातपुतेला तारले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.