चोरट्यांचे थैमान; गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प
प्रशांत जाधव
सातारा – शहराचा वाढता पसारा आणि त्यामुळे वाढत असलेले गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याने 2014 साली शाहूपुरी पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्यानंतर रवींद्र पिसाळ, विनायक वेताळ, किशोर धुमाळ या अधिकाऱ्यांनी मान उंचावेल असे काम केले. मात्र, नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना कायदा सुव्यस्था राखण्यात सपशेल अपयश आल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात सक्षम अधिकाऱ्याची नेमणक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मध्यवर्ती बसस्थानक आणि महामार्गाचा काही भाग शाहूपुरीच्या हद्दीला लागून येतो. या परिसरात सराईत गुन्हेगारांबरोबरच भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. सतत घडत असलेल्या सोनसाखळीच्या चोऱ्या, लुटमारीकडे शाहूपुरी पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बसस्थानक परिसरात ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांचा व एजंटांचा सुळसुळाट असतो. रात्री बसस्थानकाजवळून पुणे-मुंबई मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्स बसेस जाताच, त्याठिकाणी प्रवाशांना टॅव्हल्सच्या कामगारांकडून अक्षरश: ट्रॅव्हल्स बसमध्ये बसण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा प्रकार नजरेस पडतो.
तसेच याच ठिकाणी असलेल्या रिक्षा थांब्यावर काही सराईत गुन्हेगारांचा वावर वाढत असून, त्यांच्याकडून येथील ट्रॅव्हल्स एजंट, रिक्षाचालक, तसेच प्रवाशांना दमदाटीचे प्रकार वाढत आहेत. खंडणी वसुलीचेही प्रकार घडत आहेत. मात्र, शाहूपुरी पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात चोऱ्या, घरफोड्या, रॉबरी, पर्स चोरीसह अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात अपवाद वगळता शाहूपुरीच्या कारभाऱ्यांना अपयश आले आहे. मात्र, ते अपयश झाकण्यासाठी ते सेकंड प्रायोरीटीच्या कामांना प्राधान्य देत वरिष्ठांच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.
दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडत असणाऱ्या चोरीच्या घटना, तसेच वाढती गुन्हेगारी यामुळे नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. मात्र तरीही पोलिसांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने खेद व्यक्त केला जात आहे.
कारभाऱ्यांचा भर आवाहनावर
बसस्थानक परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या भागात शाहूपुरी पोलिसांचा नियमित वावर असताना गुन्ह्यांचे प्रमाण रोखता येत नसल्याबद्दल त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे. असे असले तरी शाहूपुरीचे कारभारी चोरी होणार नाही यासाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन करतात पण चोरटे पकडण्यासाठी कोणतीही आखणी करताना दिसत नाहीत.
पोलिस चौक्या उरल्या नावालाच
शाहूपुरी पोलिसांच्या कॅप्टन शिंदे चौकी, मोळाचा ओढा येथील चौकीला उघडण्यास नेमका कधी मुहूर्त लागणार ते कारभाऱ्यांनाच माहीत. बसस्थानक परिसरात झालेल्या पर्स चोरीच्या दोन प्रकारातील एकाही गुन्ह्याचा तपास लावण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले नाही. त्यांच्याकडून आव्हानात्मक असा सोनसाखळी चोरी, घरफोडीचा एकही गुन्हा उघडकीस आणल्याचे ऐकिवात नाही.