अतिवृष्टीने साडेसात हजार एकर बाधित

हवेली तालुक्‍यातील तरकारी पिकांना जबर तडाखा : कांदा, भाजीपाला मातीमोल

थेऊर – हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीने घातलेल्या थैमानामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास बळीराजाच्या हातून हिसकावल्याने नुकसानीच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रामुख्याने कांदा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याचे महसूल व कृषी विभागाने संयुक्‍तपणे केलेल्या पंचनाम्यावरून दिसून येत आहे. जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंतच हवेलीमध्ये 3100 हेक्‍टर म्हणजेच 7750 एकर पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. अद्याप ऑक्‍टोबर महिन्यातील आकडेवारी यायची बाकी असल्याची माहिती हवेलीच्या तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार शासकीय सुट्टीच्या दिवशीही महसूल विभागातील तलाठी, कोतवाल, कृषी सहायक व ग्रामसेवकांचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर आहे. कोलवडी, साष्टे, थेऊर, मांजरी, केसनंद, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची, तरडे, वळती, कोरेगाव मूळ, अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव, शिंदवणे, उरूळी कांचन, पेठ, सोरतापवाडी, नायगाव आदी गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. हवेलीतील यशवंत कारखाना बंद झाल्याने शेतकऱ्यांनी उसाचे पीक कमी करून भाजीपालाकडे कल वाढविल्याने हवेलीत सर्वाधिक भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील अंदाजे 450 हेक्‍टर (1125 एकर) शेतातील 800 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पंचनामे तलाठी दादासाहेब झंजे, कृषी सहायक ज्योती हिरवे, मुक्‍ता गर्जे, ग्रामसेवक एल. के. पवार हे करीत आहेत. बळीराजांनी व्यथा शासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडत आहे. थेऊर, कुंजीरवाडी भागात तलाठी दिलीप पलांडे, कृषी सहायक बालाजी पाटील, ग्रामसेवक बाळासाहेब कांबळे यांनी पंचनामे केले आहेत. थेऊरमधील 141.5 हेक्‍टर क्षेत्रातील 321 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. कुंजीरवाडीमधील 48.4 हेक्‍टर क्षेत्रातील 116 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

तरडे येथील 193.9 हेक्‍टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. यात 383 शेतकरी बाधित आहेत. वळती येथील 79.6 हेक्‍टर क्षेत्रात 157 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. यात कांदा, फुलशेती व भाजीपाला शेतीला फटका बसल्याची माहिती कृषी सहायक बालाजी पाटील यांनी दिली. ऊरूळी कांचन सर्कलमध्ये तलाठी प्रदीप जवळकर, कोतवाल, कृषी सहायक पाहणी करीत असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती मंडलाधिकारी दीपक चव्हाण यांनी दिली.

पेठ, नायगाव परिसरात भाजीपाला सडला
पेठ, नायगाव, सोरतापवाडी, गावांमध्ये 151 हेक्‍टर भाजीपाला क्षेत्राला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने 386 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तलाठी निवृत्ती गवारी यांनी दिली. मौजे कोलवडी साष्टे (ता. हवेली) येथील फ्लॉवर, कोबी व इतर भाजीपाला पिकांना जोरदार तडाखा बसला आहे. तलाठी जी. डी. शेख व कृषी सहायक रूपाली भोसले या भागातील पंचनामे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)