वाहन परवान्यासाठी आता ‘शपथविधी’

पिंपरी – वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता वाहन परवाना काढण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला चाचणी देण्याअगोदर वाहतूक नियम पाळण्याची शपथ घ्यावी लागणार आहे.

याबाबतच्या सूचना परिवहन आयुक्तालयाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिल्या आहेत. याबाबतची कठोर अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाने सांगितले आहे. राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

यामध्ये वाहनचालकांनी वाहनांचा वेग नियत्रंणात ठेवणे, हेल्मेट परिधान करणे, मोबाइलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालविणे, वाहतूक नियमांचे पालन करणे यासाठी विविध उपक्रमामार्फत जनजागृती करण्यात येते. यासाठीच केंद्र शासनानेसुद्धा मोटार वाहन कायद्यात मोठे बदल केले असून, दंड वाढ करण्याचा विचार केला आहे. तर राज्यातील पुणे शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती.

याचा एक भाग म्हणून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. आता वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात शपथ घ्यावी लागणार असून अशी सक्तीच करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.