- वीज बिलाचे 35 लाख 67 हजार रुपये थकीत
- नगरपंचायत टप्प्या-टप्प्याने विद्युत बील भरणार
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीकडे वीज बिलाचे सुमारे 35 लाख 67 हजार रुपये थकल्याने पाणीपुरवठा प्रकल्पावरील विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र खासदार श्रीरंग बारणे यांनी तात्काळ वेळीच दखल घेत महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नगरपंचायत टप्प्या-टप्प्याने विद्युत बील भरले जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित न केल्याने देहूकरांवरील ऐन उन्हाळ्यातील पाणी टंचाईचे संकट तात्पुरते टळले आहे.
देहूगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाल ऑगस्ट महिन्यामध्ये संपल्यानंतर प्रशासकीय कारभार सुरू झाले. महिला शुद्धीकरण पाणी पुरवठा प्रकल्प आणि पथदिवे यासाठी होणारा विद्युत पुरवठा पोटी ग्रामपंचायतीकडे 24 लाख 72 हजार रुपये थकबाकी होती. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी (8 नोव्हेंबर) नगरपंचायत रूपांतर झाले. मात्र नगरपंचायत स्थापन होताच प्रशासक कामकाज पाहत आहेत. नगरपंचायतीमध्ये हस्तांतरित होताना आवश्यक रक्कम शिल्लक नसल्याने महापारेषणचे नगरपंचायतीकडे सुमारे 33 लाख रुपये वीजबिल थकले होते.
महापारेषणने महिला शुद्धीकरण प्रकल्पावरील विद्युत पुरवठा (27 फेब्रुवारी) खंडित केला होता, तर पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा आदेश दिले होता. पाणी पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती देहू शिवसेना शहरप्रमुख सुनील हगवणे यांना मिळताच त्यांनी खंडित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे देहूकरांची तारांबळ उडण्याची माहिती खासदार बारणे यांना माहिती देऊन देहूकर यांचे पाणीपुरवठा संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आवश्यक पाणीपुरवठा याची खासदार बारणे यांनी दखल घेत महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्युत पुरवठा बंद करू नका, पुढील सहा महिन्यांत टप्प्या-टप्प्याने थकबाकी भरतील, असे आश्वासन दिल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आली नाही, त्यामुळे देहूकरांवरील तात्पुरते पाणी संकट टळले आहे.