नवी दिल्ली : देशात करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध पूर्णपणे शिथील करण्यात आले आहेत. मात्र, करोनाचे संकट अजूनही टळलेले दिसत नाही. कारण आता तेलंगणा राज्यात ओमायक्रॉनचा विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची एंट्री झाली आहे. राज्यातील एका व्यक्तीला या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा देशात चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, “ही व्यक्ती ८० वर्षीय असून त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. विशेष म्हणजे या व्यक्तीने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. INSACOG या जिनोम सिव्वेंसिंग करणाऱ्या संस्थेकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे.
ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत. याआधी ओमायक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ या उपप्रकारांमुळे दक्षिण आफ्रिकेत करोनाची पाचवी लाट आली होती. त्यांतर या उपप्रकराचा फैलाव युनायटेड स्टेट्स तसेच युरोपीय देशांमध्ये पसरला होता. याच कारणामुळे युरोपीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने ओमायक्रॉनच्या बीए-५ या उपप्रकाराला चिंताजनक म्हटले आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही या उपप्रकाराला दखलपात्र आणि चिंताजनक असल्याचे म्हणत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या उपप्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असली तर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण किंवा मृत्यूसंख्या वाढलेली नाही. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले आहे. तसेच मागील करोना लाटांमध्ये नागरिकांमध्ये मिश्र रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतात सध्या मृत्यूसंख्या वाढण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.