वर्गणी मागणाऱ्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा

पिंपरी  – लघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी भोसरी एमआयडीसी येथे घडली. जावेद पठाण (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) आणि त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हलागौडा शिवलिंग ओंकार (वय ४३, रा. दुर्गा निवास इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी व त्याचे साथीदार हे फिर्यादी हलागौडा यांच्या भोसरी एमआयडीसी येथील साई इंजिनीअरिंग या कंपनीत आले. त्यांनी ‘क्रांतीवीर तरुण मित्र मंडळ’ असे नाव लिहिलेली पाच हजार रुपयांची पावती जबरदस्तीने फिर्यादी हलागौडा यांना दिली. तसेच पैसे नेण्यासाठी नंतर येतो, असे सांगून जर वर्गणी दिली नाही तर पाहून घेतो, अशी धमकी दिली. दोन महिन्यांपूर्वी मीच तुम्हाला मारले होते, ओळखले ना? असे म्हणून शिवीगाळ करून पुन्हा धमकी देऊन आरोपी निघून गेले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.