मायणी, (प्रतिनिधी) – खटाव (वडूज) येथे कार्यरत असणारे दुय्यम निबंधक श्रेणी १ संतोष जाधव यांचा भ्रष्ट व मनमानी कारभार चालू आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्यांची नाहक पिळवणूक होत आहे. त्यामुळे संतोष जाधव यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हिंमत देशमुख यांनी केली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असल्याची माहिती दिली. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दुय्यम निबंधक संतोष जाधव हे सर्व परवानाधारक स्टॅम्प वेंडर व एजंट यांना हाताशी धरुन प्रत्येक दस्तामध्ये दस्ताच्या मुल्यंकनानुसार जादा रक्कम मागणी करतात.
यामुळे सामान्य लोकांची मोठ्या प्रमाणत लुट केली जात आहे. कार्यालामध्ये नोंदणीसाठी सादर केलेल्या दस्तएवजामध्ये कोणतेही कारण नसताना काहीतरी त्रुटी काढणे व त्याच्याबद्दल रकमेची दस्तएवजाच्या किमतीच्या प्रमाणात अर्धा टक्के ते दोन टक्क्याने पैसे घेऊन सदरचे दस्तएवज नोंदणीकृत करणे. तसेच खरेदीपत्र करणेकामी जे मुल्यांकन काढले जाते ते जादा रक्कमेने काढले जाते.
तसेच ग्रीन झोन (शेती) मधील जमिनीस संभाव्य बिगर शेती जमिनीचे जादा मुल्यांकन करून सातबारावर पेनाने लिहन देणे, याचे मुल्यांकन कमी करण्यासाठी पैसे घेऊन तडजोड करणे, नोदणीसाठी सादर केलेले दस्तएवज ज्या दिवशी परगावाहून आलेल्या लोकाना आज दस्त होणार नाही, अशी भीती दाखतून परवानाधारक स्टेंम्प एजंट यांच्या संगनमताने सदरचा दस्त नोंदणीसाठी पैसे घेऊन तडजोड करणे.
नोंदणीसाठी सादर केलेले दस्तएवजामध्ये सातबारा सदरीवर्षाचे पिकपाणी नसले तर त्याबददल तड़जोड करुन जादा रक्कमेची मागणी करून दस्त नोंदणी करणे. दस्त नोंदणी करण्यासाठी पैसे देण्यारया खातेदारासाठी ऑनलाईनची वेळ वरिष्ठांकडून वाढवून घेऊन रात्री ८.३० पर्यत ऑफिस चाल् ठेऊन दस्त नोंदणी केले जातात.
पुरावे आम्ही देण्यास तयार
संतोष जाधव यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवलेली आहे. व त्याची बारामती पुणे हायवे लगत जमिनीमध्ये व इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची संपूर्ण निपक्षपातीचौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे.
अन्यथा याविरोधात पिडीत लोकांना सोबत घेऊन आमरण उपोषण, रस्ता रोको आंदोलन उभे केले जाईल. गरज वाटल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून संतोष जाधव यांच्या चौकशीचे आदेश मिळणेसाठी कोर्टास विनंती करावी लागेल. याबाबतचे पुरावे ही आम्ही देण्यास तयार असल्याचे या निवेदनात हिंमत देशमुख यांनी म्हटले आहे.