पुणे – करोनाचा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी लष्कर परिसरातील बंगलो एरियात घरोघरी पाहणी मोहिमेस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामध्ये आजारी व्यक्ती, नुकतेच परदेशात जाऊन आलेले नागरिक आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जाणार आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत जवळपास 240 बंगले (ओल्ड ग्रांट) असून, त्यामध्ये अनेक ज्येष्ठ सैन्याधिकारी आणि नागरिक राहतात. त्यापैकी अनेक जण देशात, परदेशात प्रवास करतात. अशा सर्वांची तपासणी या मोहिमेत केली जाणार आहे. त्यासाठी सहा जणांचे पथक नेमण्यात आले असून, त्यामध्ये कमांड हॉस्पिटलचे दोन डॉक्टर, सरदार पटेल रुग्णालयाच्या दोन परिचारिका आणि बोर्डाच्या आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी, अशा सहा जणांचा समावेश आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि स्थानिक लष्करी प्रशासनाने (एलएमए) सोमवारपासून कॅन्टोन्मेंटमधील घोरपडी व वानवडी परिसरातील बंगल्यांमध्ये पाहणी मोहीम सुरू केली आहे. प्रारंभी बंगलो एरियात ही तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्येक वॉर्डातील घराघरांमध्ये जाऊन आजारी व्यक्ती, परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तींची, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये करोनाबाधित अथवा संशयित आढळल्यास त्या व्यक्तीला नायडू हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे, असे पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी सांगितले.