पुणे – डॉक्‍टर, नर्सेस, स्टाफचे योगदान महत्त्वपूर्ण

उपमुख्यमंत्री अजित पवार; वारजे येथील कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन

वारजे – करोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील करोना योद्धांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. करोना संसर्गाच्या वाढत्या काळात वारजे-माळवाडी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून या भागातील बाधितांना चांगली आरोग्य सेवा-सुविधा मिळेल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केला.

वारजे-माळवाडी येथे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या 101 बेड क्षमतेच्या “छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर’चे ऑनलाइन उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्‍त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्‍त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्‍त संतोष पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्‍टर व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, करोना बाधित रुग्णांना आवश्‍यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व यंत्रणांना युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे. करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी करोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. नगरसेवक सचिन दोडके यांनी पुढाकार घेवून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वारजेसह आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल. ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत झाल्यावर या कोविड सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेड व्यवस्था होण्यासाठी ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.