कोरेगाव भीमामध्ये सामाजिक ऐक्याचे दर्शन ः मुस्लीम बांधवांची गैरसोय टळली
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील जामा मशिद बांधण्यासाठी हिंदू व बौद्ध समाजाने लोकवर्गणीद्वारे
पुढाकार घेत मशिदच्या बांधकामाला हातभार लावला आहे. सामाजिक सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आणखी एक पाऊल टाकल्याने कोरेगाव भीमा व परिसरातील सामाजिक वीण अधिक घट्ट होण्यास मदत मिळाली आहे.
कोरेगाव भीमा परिसरामध्ये यापूर्वी झालेल्या दंगलींमुळे कोरेगाव भीमा गावाच्या नावलौकीकात डाग लागलेला असल्याने सामाजिक तणाव निर्माण झाला होता. मात्र, या अप्रिय घटनांतून प्रत्येकवेळी सामाजिक ऐक्य अबाधित राहण्यासाठी पुढाकार ग्रामस्थ घेतला आहे. कोरेगाव भीमात महापुरुषांच्या जयंत्या, राष्ट्रीय सण उत्सव यांसह विविध उपक्रमांद्वारे सर्वधर्म समभावाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करून सर्व समाजाला एकत्र करीत सामाजिक वीण पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्न केला. तर आता यामध्ये अजून एक पाऊल पुढे टाकीत कोरेगाव भीमा मशिदच्या वाढीव इमारत बांधकामात देखील हिंदू, बौद्ध समाजाने दाखवून देत सलोखा जपण्याचे काम केले आहे.
कोरेगाव भीमा परिसरात एकमेव मशिद असल्याने पंचक्रोशीतील मुस्लीम समाजबांधव याठिकाणी नमाज पठण करण्यासाठी येत असतात; परंतु याठिकाणी नमाज पठणासाठी उन्हाळ्यात व पावसाळ्यामध्ये नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांची गैरसोय होत होती.
यासाठी जामा मशिदच्या वरती वाढीव इमारत बांधणीसाठी मुस्लीम समाजाने गावातील सर्व समाजाला विश्वासात घेत वाढीव इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. यावेळी विठ्ठल ढेरंगे, पी. के. गव्हाणे, नारायणराव फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक गव्हाणे, विक्रम गव्हाणे, कैलास सोनवणे, अनिल काशिद, बाळासाहेब फडतरे, विजय गव्हाणे, संजय काशिद, अशोक काशिद, संदीप ढेरंगे, महेश ढेरंगे, केशव फडतरे, विक्रम दौडकर, बबनराव गव्हाणे, पोपट ढेरंगे, दत्तात्रय ढेरंगे, प्रकाश ढेरंगे, जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, आशा काशिद, मालन साळुंके, विलास खैरमोडे उपस्थित होते.