पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये करोनामुळे बंद असले तरी बहुतांश शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पी. के. स्कूलमध्ये शिक्षकांना वंदन
पिंपळे सौदागर -डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी काटे म्हणाले, मागील वर्षापासून आपण करोनाशी संघर्ष करत आहोत. यावर्षी देखील शिक्षक दिनासाठी विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी ऑनलाइन सहभाग घेऊन शिक्षक दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयीच्या भावना व आदर भाषणातून व्यक्त केला. शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर यांनी शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे, अशी भावना व्यक्त केली.
डॉ. दिलीप गरूड यांना बालकमित्र पुरस्कार
सांगवी -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड यांना बालक संस्थेच्या वतीने, बालकमित्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते देण्यात आला.
डॉ. गरुड यांनी सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून, गेली तीन दशके महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी कथाकथन केले. शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी ते मार्गदर्शन करत असतात. त्यांची सुमारे तीस पुस्तके प्रकाशित असून, ते अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कोशाध्यक्ष व शिक्षण संक्रमण मासिकाचे संपादन मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
निगडी -क्रीडा दिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा क्रीडा भारती व निगडी लायन्स क्लब यांच्या वतीने 5 ते 7 वी वयोगटातील वक्तृत्व स्पर्धेत अमृता विद्यालयाची विद्यार्थिनी दिशा पवार हिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले आहे. ही स्पर्धा निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे झाली. या स्पर्धेत सिटी प्राइड स्कूल, अमृता विद्यालय, एस. एन. बी. पी. स्कूल, उर्सुला स्कूल, सेंट अन्स जोसेफ स्कूल, मॉडर्न स्कूल यांसह अनेक शिक्षण संस्थांमधील मुलांमुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत 5 वी ते 7 वी आणि 8 वी ते 9 वी अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.
जाधववाडी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या साई जीवन प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना प्रभाग दोनच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांनी भेटवस्तू व आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या सर्वांच्या जीवनाचा शिल्पकार हा आपला शिक्षक असतो. त्याकरिता आपल्या जीवनात त्यांना प्रथम स्थान दिले जावे. याकरिता शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने आज सन्मानित केले.
चिंचवड -कमला शिक्षण संकुल संचालित प्रतिभा महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी ऑनलाइन पद्धतीने प्राध्यापकांबरोबर संपर्क साधून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका सविता ट्रव्हीस आदींनी यात सहभाग घेतला.कमला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी. एड. विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीनी प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रा. मनीषा पाटील, डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. सुनील भोंग, डॉ. संतोष उमाटे, प्रा. अस्मिता यादव आदींच्या उपस्थितीत बी.एड.च्या विद्यार्थिनी वृषाली पोतदार, पल्लवी जाधव, गुलअफरोज शेख, सुप्रिया प्रभुणे, मनीषा कांबळे, बिंदू अंजिव, सुचिता उन्हाळे, सायली खरखडे यांनी केक कापून शिक्षक दिन साजरा केला.