नगर, (प्रतिनिधी) – टिळक रस्ता, स्वस्तिक चौक येथील शाहाबाद एन्टरप्रायझेस वेअर हाऊस गोडावूनच्या पाठीमागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून ३ लाख ९१ हजार ३५६ रूपये किमतीचे इलेक्ट्रीक साहित्य चोरून नेले. याप्रकरणी मंगळवारी (दि. ३०) रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहंमद वाहिदोदिद्दन काझी (वय ३५ रा. सुयोग अपार्टमेंट, बुरूडगाव रस्ता, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
काझी हे इलेक्ट्रीकल्स व बांधकामाचे ठेकेदार आहेत. त्यांनी इलेक्ट्रीक साहित्य ठेवण्यासाठी चंद्रकांत विठ्ठल फुलारी यांच्या मालकीचे टिळक रस्ता, स्वस्तिक चौक येथील जागा व गोडाऊन भाडेतत्वावर घेतले आहे. त्यांनी ते गोडाऊन २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उघडून सायंकाळी सात वाजता बंद केले होते.
ते व त्यांचा भाऊ हमिदोदिद्दन काझी २१ एप्रिल रोजी दुबई येथे गेले होते. ते दोघे २६ एप्रिल रोजी घरी आले. फिर्यादी काझी यांनी दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गोडाऊन उघडले असता त्यांना गोडाऊनमधील इलेक्ट्रीक साहित्य अस्तव्यस्थ पडलेले दिसले. गोडाऊनमधील पाठीमागील पत्रे उचकटून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले.
गोडाऊनमधून आर्मड वायर, कॉपर वायर, एलईडी स्ट्रीट लाईट, स्टार्टर, स्वीच व इतर इलेक्ट्रीक साहित्य चोरीला गेले आहे. काझी यांनी मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.