मोरगाव, (वार्ताहर) – बारामती तालुक्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालेल्या असून तालुक्यात 17 गावे व 207 वाडीवस्तीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. य गावांमध्ये टँकरद्वारे रोज 79 खेपा सुरू असून 43 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येला टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र हा पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपात होत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात 15 दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याने ऐन उन्हात पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ आली आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याअभावी सर्वत्रच बिकट परिस्थिती निर्माण झाले आहे. तालुक्याच्या वाडीवस्त्यांवर गावावरील पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालेले आहे. तरडोली, लोणी भापकर, मासाळवाडी, गोजुबावी, भिलारवाडी, माळवाडी, लोणी भापकर, जळगाव कप, देऊळगाव रसाळ, पानसरेवाडी, बाबुर्डी, कुतवळवाडी भोंडवेवाडी, अंजनगाव, कारखेल, कार्हाटी, जळगाव सुपे,
कर्हावागज, मुढाळे, सावंतवाडी, उंडवडी कप, गाडीखेल, जैनकवाडी, कोळोली, वढाणे, सोनवडी सुपे, नारोळी, खराडेवाडी, आंबे बुद्रुक, आंबी खुर्द, मोरगाव या 43 गावांसह 207 वाड्यावस्त्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
हे टँकर भरुन देण्यासाठी मोढवे व बारामती येथील दोन पॉईंट दिले जात आहे. या गावांमध्ये टेम्पोद्वारे 79 खेपा दररोज केल्या जात आहे. मात्र या खेपांचे विस्कळीत स्वरूपामुळे या भागातील जनता पाणीपाणी करीत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक गावांमध्ये टँकरच्या योग्य नियोजना अभावी अनेकांना अनेक गावांमध्ये 15 दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे.
दैनंदिन वापरासाठी पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्याचा चटका खात या भागातील जनतेला दाही दिशा करावे लागत आहे. नुकतेच पाण्याअभावी तरडोली येथील ग्रामस्थ ही मोठ्या प्रमाणात आक्रमक पवित्र घेतला होता. यामुळे आणखी टँकर पुरवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पाण्याबाबत बारामती पिछाडीवरच
कधी गुंजवणीचे तर कधी, कधी टाटा धरणाचे तर कधी वीर धरणाचे याच आशेवर येथे जनता आजही असून पाण्यासाठी वाट पाहणारी ही चौथी पिढी आहे. या पाण्याकडे चातकाप्रमाणे लक्ष लावून आहे. गेले तीन पिढ्या शेतीच्या पाण्यासाठी आसुसलेली जनता शेतीचे नव्हे तर पिण्याचे पाणी तरी पोटभर द्या असे सध्या म्हणत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना अजून पिण्याचे पाणी पोटभर मिळत नसल्याची खंत बारामती तालुक्यात आहे. राज्यात बस स्थानकापासून ते प्रशासकीय इमारती बाबत एक मॉडेल ठरणारे बारामती मतदार संघ मूलभूत सुविधा पुरविण्याच्या बाबतीत मात्र पिछाडीवर आहे एवढे मात्र निश्चित होते.