शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांनी शाळेला ठोकले कुलूूप

जातेगावच्या 3 शिक्षकांची एकाच वेळी बदली 

जामखेड – शाळा सुधारण्यासाठी मोलाचा वाटा आसणाऱ्या जातेगाव येथील जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यामुळे पुन्हा तेच शिक्षक आम्हाला मिळावेत, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेस कुलूप ठोकत दुसऱ्या दिवशी शाळा बंद ठेवून चाव्या पालकांच्या हाती दिल्या.

तालुक्‍यातील जातेगाव येथे 1 ली ते 7 वी पर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेवर एकूण मुख्याध्यापकासह 6 शिक्षक नियुक्त आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्यामध्ये जातेगाव येथील सहापैकी संदीप गायकवाड, पारुबाई मुसंडे व वैशाली सोनकांबळे या तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदल्या झालेल्या शिक्षकांनी शाळा व विद्यार्थी घडवण्यासाठी जीवाचे रान केले व शाळेचे नाव उज्ज्वल केले. शाळेचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात या तीनही शिक्षकांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे या शिक्षकांवर जातेगाव येथील विद्यार्थी व पालक जाम खूश होते.

शाळेचा आज शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवस आसल्याने विद्यार्थी पालकांसमवेत शाळेत आले, मात्र यावेळी पालकांना व विद्यार्थ्यांना तीन शिक्षकांची बदली झाली असल्याचे समजले. त्यामुळे उर्वरित तीन शिक्षकांवर शाळा कशी चालणार या कारणास्तव विद्यार्थी व ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी पुर्वी असलेल्या शिक्षकांची शाळेत नेमणूक करा असा पवित्रा घेतला. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनीदेखील स्वतः शाळेस कुलूप ठोकून चाव्या पालकांच्या हाती दिल्या.

त्यामुळे आज एकीकडे पहिल्या दिवशी शाळा सुरू झाल्याने शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत होते, तर दुसरीकडे जातेगाव येथे तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद ठेवून दुसऱ्या दिवशीही शाळा बंद होत्या. बदल्या झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करून, ताबडतोब शाळेवर शिक्षक रूजू करण्यात यावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी व ग्रामस्थांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here