शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा ; ओहोळ

कॉंग्रेसच्या अनेक निष्ठावंतांना डावलून अध्यक्षपद विखेंना दिले 

संगमनेर -विखे परिवार आता भाजपवासी झाला असल्याने शालिनी विखे यांनी अद्याप कॉंग्रेस पक्षाचा व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. कॉंग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आलेल्या शालिनी विखे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ओहोळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींच्या आदेशाने जि. प. अध्यक्षपदाची माळ तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांच्या गळयात पडली होती. त्यावेळी अनेक निष्ठावंत कॉंग्रेस सदस्यांना डावलून ही जबाबदारी विखे यांना देण्यात आली. शालिनी विखे यांचा परिवार हा भाजपवासी झाला आहे.

मुख्यमंत्र्यांचा सत्कार करताना त्या राधाकृष्ण विखे यांच्या समवेत असल्याची छायाचित्रे प्रसिध्द झाली आहेत. याचा अर्थ त्या पुत्र आणि पती यांच्यासह भाजपवासी झाल्या आहेत. शालिनी विखे या राहता तालुक्‍यातून कॉंग्रेसच्या पंजा चिन्हावर जिंकल्या आहेत. तद्‌नंतर त्या जि. प. अध्यक्ष बनल्या. परंतु विखे परिवाराने कॉंग्रेस पक्ष सोडला असल्याने त्वरीत कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ओहोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कॉंग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, कॉंग्रेस विधिमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सुधीर तांबे यांनाही ओहोळ यांनी निवेदन पाठविले असून, पक्षाच्या श्रेष्ठींनी विखे यांना त्वरित राजीनामा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.