उत्तरकाशी – उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बोगद्यात रात्रभर झालेल्या अडथळ्यामुळे ड्रिलिंगला काही तास वाया गेल्यानंतर गुरुवारी पुन्हा बचावकार्य सुरू झाले.
उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोगद्यात अडकलेले कामगार लवकरच बाहेर येतील. एनडीआरएफच्या पथकांसह इतरही बचाव पथकं रात्रभर खोदकाम करत आहेत. सर्व कामगार सुरक्षित असल्याची चित्रफीत “एनडीएमए’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) जारी केली होती. सर्व कामगार सुखरूप असून आता त्यांच्या सुटकेसाठी नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बचाव पथकांनी आडव्या दिशेने खोदकाम सुरू केले आहे.
मजुरांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच आघाड्यांवर प्रयत्न चालू आहेत. सिल्क्यारा बोगद्यात रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आल्या आहेत. यासह डॉक्टरांचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. कामगारांना बाहेर काढल्यानंतर लगेचच त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच आवश्यकता असल्यास या कामगारांना जवळच्या रुग्णालयात नेले जाईल.
काश्मीर आणि लडाखला जोडण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या जोजिला बोगद्याचे प्रकल्प प्रमुख आणि बचाव पथकातील सदस्य हरपाल सिंह म्हणाले, पुढच्या काही मिनिटांमध्ये बचाव मोहीम पूर्ण होईल.