उत्तरकाशी – येथील कोसळलेल्या बोगद्यात (Silkyra tunnel) दोन आठवड्यांपासून अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यासाठी रविवारी उभ्या ड्रिलिंगला (Driling) सुरूवात करण्यात आली. ऑगर मशीन खराब झाल्याने आता सुटकेचा नवीन मार्ग तयार करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. (Uttarkashi tunnel)
एनएचआयडीसीएलचे एमडी महमूद अहमद यांनी सांगितले की, सर्व कामगारांची सुटका करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. उभ्या ड्रिलिंगला सुरुवात झाली आहे आणि (15 मीटरपर्यंत) आधीच ड्रिल करण्यात आली आहे. कोणत्याही अडथळ्याचा सामना न केल्यास बोगद्याच्या वरच्या टेकडीच्या माथ्यावरून अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यास सुमारे 100 तास लागतील. यासाठी वरून 86 मीटर खाली ड्रिल करावे लागेल. यानंतर अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्याचा कवच तोडावा लागेल, अशी माहिती त्यांनी दिली. (Silkyra tunnel)
तसेच कामगारांच्या सुटकेसाठी तब्बल सहा योजना अंमलात आणल्या जात आहेत. परंतु आतापर्यंत सर्वोत्तम पर्याय आडवा ड्रिलिंग आहे ज्या अंतर्गत 47 मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. मात्र, ड्रिलिंग दरम्यान अडथळे आल्याने ऑगर मशीनचे तुटलेले भाग पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे.
सिल्क्यरा बोगद्याच्या (Silkyra tunnel) ढिगाऱ्यात अडकलेले ऑगर मशीनचे भाग कापण्यासाठी आणि काढण्यासाठी रविवारी हैदराबादहून प्लाझ्मा कटर आणण्यात आले आहे. ऑगर मशीनचे ब्लेड ढिगाऱ्यात अडकल्याने दोन दिवसांपासून काम ठप्प होते. सध्या बोगद्याच्या आत प्लाझ्मा आणि लेझर कटरच्या सहाय्याने ढिगाऱ्यात अडकलेल्या ऑगर मशीनचे शाफ्ट आणि पंख काढण्याचे काम सुरू आहे, असे बचाव कार्याचे राज्य नोडल अधिकारी नीरज खैरवाल यांनी सांगितले.